'तुमच्या बहिणीची भेट घालून देतो', फूस लावून दोघींना नेले अन् केला अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना
By नम्रता फडणीस | Updated: March 26, 2025 17:00 IST2025-03-26T16:59:52+5:302025-03-26T17:00:03+5:30
शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तर शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून केला अत्याचार

'तुमच्या बहिणीची भेट घालून देतो', फूस लावून दोघींना नेले अन् केला अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना
पुणे : अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, तसेच विवाहाच्या आमिषाने मुलींवर बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी चारशेहून जास्त गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या वर्षीही त्यात वाढ झाली आहे. शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या दोन घटना समोर आल्या आहेत. शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर तसेच शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना नगर रस्ता भागात घडली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलींच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील चौकात प्लास्टिक पिशवी, पेन, तसेच फुले विक्री करण्याचे काम मुली करतात. दोघी सख्ख्या बहिणी आहेत. पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय फिरस्ते असून, ते किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करतात. पीडित मुलींच्या बहिणीचा विवाह आरोपी अल्पवयीन मुलांच्या नात्यातील एकाशी करण्यात आला आहे. त्यामुळे मुली आरोपींना ओळखतात. दि. १७ मार्च रोजी अल्पवयीन मुले शिवाजीनगर भागात आले. त्यांनी मुलींना गाठले. तुमच्या बहिणीची भेट घालून देतो, असे त्यांनी दोघींना सांगितले. त्यानंतर फूस लावून दोघींना दुचाकीवरून घेऊन गेले. त्या वेळी आरोपी मुलांची आई तेथे होती. मुलींवर दोघांनी बलात्कार केला. मुलींनी आई-वडिलांकडे सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आरोपींनी मुलींना पुन्हा शिवाजीनगर भागात सोडले. घाबरलेल्या मुलींनी या प्रकाराची माहिती आईला दिली. पीडित मुलींच्या आईने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे, असे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक हिरे तपास करत आहेत.
दरम्यान, शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना नगर रस्ता भागात घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शाळकरी मुलीचा पाठलाग करायचा. शाळेत जात असताना आरोपीने तिला धमकावले. तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन आरोपीने बलात्कार केला. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.