...तोपर्यंत काम करतच राहीन! - अमिताभ बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 08:55 PM2020-10-18T20:55:32+5:302020-10-18T21:33:33+5:30
Amitabh Bachchan : सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाइन पद्धतीने आयोजित सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
पुणे : आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. पण, त्यातूनच शिकत गेलो. स्वतःमध्ये सुधारणा करत राहिलो. आजही नवीन चित्रपट किंवा प्रोजेक्ट्सवर काम करताना ते यशस्वी होतील की नाही याची चिंता असतेच. पण कुणी काही बोलले तरी कायम कामावरच लक्ष्य केंद्रित केले. वयानुरूप मला आजही काम मिळत आहे. जेव्हा काम मिळणे बंद होईल, तेव्हाचं थांबेन. जोपर्यंत काम मिळत राहील आणि रसिक थांबा म्हणणार नाहीत तोपर्यंत मी काम करतचं राहीन... हे प्रेरणादायी शब्द आहेत, भारतीय चित्रपटसृष्टीचा 'शहेनशहा' ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचे.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाइन पद्धतीने आयोजित सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. भारतीय चित्रपटसृष्टीमधील गेल्या पन्नास वर्षातील कारकिर्द उलगडताना अमिताभ बच्चन काहीसे भावूक झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
चित्रपटाच्या तीन तासाच्या कथेमधून विषयाला न्याय मिळतो. जो वास्तव जीवनात मिळवायला कदाचित वर्ष लोटतात. 'पिंक' चित्रपटातला 'नो' हा शब्द समाजात किती महत्वपूर्ण आहे. त्यामागची ताकद अनेकांना माहिती नव्हती. ती एका कथेतून कळली. 'ब्लॅक' चित्रपटातला शिक्षक जेव्हा दिव्यांग विद्यार्थिनीला तू हे करू शकतेस याबाबत प्रोत्साहन देतो. तेव्हा त्या मुलीच्या आयुष्यात घडलेला बदल अनेकांना नि:शब्द करून जातो. कथेतून मांडलेले हे प्रभावी विषय खूप बदल घडवून जातात. कोणतीही प्रतिमा मग ती 'अँग्री यंग मॅन' ची का असेना समाजातून निर्माण होत असते. कारण त्यांना अन्यायाला वाचा फोडणारा असा कुणीतरी व्यक्ती हवा असतो आणि त्याला घडविण्यात दिग्दर्शकाचा वाटा अत्यंत महत्वपूर्ण असतो, असे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये माध्यमांची अनेक स्थित्यंतरे झाली. त्याकडे कसे पाहाता? याविषयी सांगताना प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आता पाचवे माध्यम म्हणून सोशल मीडियाचा उल्लेख करावा लागेल. ज्यांनी आज आपल्या जीवनात महत्वपूर्ण स्थान मिळवले आहे. मी देखील ब्लॉग, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, वर सक्रिय असतो..ही माझी एक फॅमिली झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन उवाच
- पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीमध्ये शब्दांचे उच्चार वेगळे आहेत. शब्दांचे उच्चारण करताना आपली 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती विसरता कामा नये. आपली भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवणे आपले काम आहे.
- आयुष्यात काही गोष्टींमुळे दिवाळखोरीचा सामना करावा लागला. घरात पैसा नसला आणि कर्जाची रक्कम फेडू शकलो नाही तर जेलची हवा देखील खायला लागू शकते हे सर्व जवळून अनुभवले. त्यामुळे कुटुंबप्रमुख या नात्याने आजही काम करीत आहे.
- कलाकारांना सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही देणेघेणे नसते हा समज चुकीचा आहे.भारतीय चित्रपट क्षेत्रातील बहुतांश कलाकार आपापल्याने परीने सामाजिक बांधिलकी जपतात. मात्र त्याची फारशी चर्चा करत नाहीत.
- कोव्हिडं काळात डॉकटर नर्स यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेले काम, त्याग प्रशंसनीय आहे. देवळात देव शोधू नका..तो अनुभवायचा असेल तर रुग्णालयात जा तिथे डॉकटर आणि नर्सेसच्या रुपात खरे देवदूत मिळतील.
- नैराश्यात असलेल्या लोकांशी बोलले पाहिजे...संवादाने खूप गोष्टी साध्य होऊ शकतात. चर्चा आणि संवाद साधला नाही तर उत्तर मिळू शकणार नाहीत.