मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या मुलाला ठार करेन; उद्योजकाला मागितली ३० लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 05:55 PM2023-01-06T17:55:41+5:302023-01-06T17:55:54+5:30
सोशल मीडियावरील प्रोफाईल चेक करुन या माहितीच्या आधारे उद्योजकांना धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे प्रकार सुरु
पुणे : बाहेरगावी सहलीला गेलो की आपण लगेचच सोशल मीडियावर छायाचित्रे स्टेटस टाकतो पण, या माहितीच्या आधारे चोरट्यांनी घरफोडी केल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. आता चोरट्यांनी पुढचे पाऊल उचलत सोशल मीडियावरील प्रोफाईल चेक करुन या माहितीच्या आधारे उद्योजकांना धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे प्रकार सुरु केले आहेत. सोशल मीडियावर मुलांविषयी टाकलेल्या माहितीच्या आधारे गुन्हेगाराने पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योजकाला ३० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने किरण रामदास बिरादार (वय २४, रा. मांजरी, पो. आवडकोंडा, ता. उदगीर ) याला अटक केली आहे. याप्रकरणी मुकुंदनगरमध्ये राहणाऱ्या एका ५२ वर्षांच्या उद्योजकाने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बिरादार बीएस्सी झालेला आहे. तो फेसबुक व इतर सोशल मीडियावरुन व्यावसायिकांची माहिती घेतो. ही माहिती मिळाल्यावर त्यांचा नंबर मिळवून त्यांच्याकडे खंडणी मागतो. फिर्यादी यांचा मुलगा कोलकत्ता येथे शिकायला असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकले होते. त्यावरुन त्याने फिर्यादींचा फोन नंबर मिळविला. त्यांना व्हॉट्सॲप कॉल केला. त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास कोलकत्ता येथे असलेल्या मुलाला ठार करेन अशा धमकीचे मेसेज पाठविले. फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाला याबाबत माहिती दिली.
पोलिसांच्या सांगण्यानुसार फिर्यादी त्याला पैसे देण्यास तयार झाले. त्यांनी १० लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या. त्याने डेक्कन येथील गरवारे पुलाखालील झुडपात पैशांची बॅग ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बॅग ठेवली. आरोपी बॅग घेण्यासाठी आला असता पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. पोलिस उपनिरीक्षक येवले तपास करीत आहेत.