"बायको येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही", नवरोबा चढला चक्क महावितरणच्या टॉवरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:46 AM2022-05-20T10:46:05+5:302022-05-20T10:46:13+5:30
रुसुन माहेरी गेलेल्या बायकोला नांदण्यासाठी परत आणायचे म्हणून एका नवरोबांनी चक्क वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढाई केली
जुन्नर : रुसुन माहेरी गेलेल्या बायकोला नांदण्यासाठी परत आणायचे म्हणून एका नवरोबांनी चक्क वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढाई केली. आणि जोपर्यंत बायको परत येत नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली येणार नाही अशी अट घातली. नवरा बायकोच्या या भांडणात शेवटी जुन्नरपोलिसांच्या मध्यस्थीला यश आले आणि अखेरीस हे नवरोबा टॉवरवरून उतरते झाले. आणि बायकोसकट ,नातेवाईक परीवार व बघ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.
ही घटना जुन्नर लगतच्या पिंपळगाव सिद्धनाथ येथे घडली. तो संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी (ता. संगमनेर) येथील रहीवासी आहे. नवरोबा त्याच्या सासुरवाडीजवळच गोद्रे गावात असलेल्या या टॉवरवर हा युवक चढला होता.
बायको नांदायला येत नसल्याने या नवरोबा सासुरवाडी गोद्रे गावच्या रस्त्यावर असलेल्या पिंपळगाव सिद्धनाथ येथील, 150 फुट उंच हायहॉल्टेज टॉवरवर हातात दोरी घेऊन चढून बसला. त्याने नातलग, तसेच पोलिसांच्या डोक्याला चांगलाच ताप दिला. जवळपास एक - दीड तास तो टॉवरवर बसला होता. यानंतर बघ्यांची मोठी गर्दी केली होती. जुन्नर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला घटनास्थळी आणले व त्याची समजूत काढली. त्यानंतर पती टॉवरवरून खाली उतरला.
नवऱ्याने चाकण येथे कामानिमित्त झालेल्या ओळखीतून गोद्रे गावातील या मुलीसोबत लग्न लावून द्या असा तगादा लावला होता. अखेरीस सहा महिन्यांपूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळून घरच्यांनी हे लग्न लावून दिले होते. याअगोदर देखील गोद्रे गावातील डोंगराच्या कड्यावर चढून या नवरोबाने धमक्या दिल्याचे समजते. तसेच या संदर्भात दोन तक्रारी जुन्नर पोलिसांकडे देण्यात आल्या होत्या. दरम्यान सदर विवाहितेला मारहाण होत असल्याने सासरी नांदायला जायला तयार नव्हती.