"नाना पटोलेंसारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही", शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 02:09 PM2021-07-11T14:09:31+5:302021-07-11T14:09:41+5:30

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता

"I will not comment on the statement of a small man like Nana Patole", Sharad Pawar | "नाना पटोलेंसारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही", शरद पवार

"नाना पटोलेंसारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही", शरद पवार

Next
ठळक मुद्दे पटोले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे

पुणे: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघडीच्या पाठीत सुरा खुपसला जात आहे. ती बिघाडीच्या मार्गाने जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशी नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला आहे. बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? या गोष्टीत मी पडत नसल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले आहे.
 
लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री आपलं काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं ते म्हणाले. आपण काही बोलायचं नाही, पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर म्हणालो होतो, यावर मी माघार घेणार नाही. त्याच्यामुळे आपण कामाला लागा. आपला माणूस खूर्चीवर बसायला हवा, असं पटोले म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच...

आमचा तीन पक्षाचा निर्णय स्वच्छ झालाय विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. समान नागरी कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. सरकार काय करतय यावर आमचे लक्ष आहे.

सरकार एक विचाराने चालवण्यावर आम्ही ठाम... 

आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही तर सरकार एकत्र चालवत आहोत. त्यामुळे एका विचाराने सरकार चालवण्यावर आम्ही ठाम आहोत. त्यात कोणताही वाद नाही. प्रत्येक राजकिय पक्षाला आपल्या संघटनेची व्याप्ती वाढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेस, शिवसेनेने याबाबत भूमिका घेतली तरी त्यात वावगे काही नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे.

Web Title: "I will not comment on the statement of a small man like Nana Patole", Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.