परतीचे दोर स्वत: कापले; २-३ दिवसांत पुढील निर्णय घेणार , वसंत मोरे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:52 PM2024-03-12T14:52:17+5:302024-03-12T14:53:17+5:30
माझ्या सहकाऱ्यांसोबत एक तास चर्चा करून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या निर्णयावरून माघारी फिरणार नाही असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
पुणे - मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. यापुढे मी काय करायचे हे पुणेकर ठरवतील. जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही. राजसाहेबांच्या हृदयात मी स्थान निर्माण केले, पण ते डळमळीत करण्याचं काम पुणे कोअर कमिटी करतेय असा आरोप करत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेत. यावेळी पत्रकार परिषदेत मोरे भावूक झाले.
वसंत मोरे म्हणाले की, २०१७ पर्यंत मनसे हा पुणे शहरातील दुसऱ्या नंबरचा पक्ष होता. मग लोकसभा निवडणुकीत कोअर कमिटीने जाणुनबुजून नकारात्मक अहवाल दिला. मी माझे परतीचे दोर कापलेत. मी कुठल्याही परिस्थितीत आता मनसेत राहणार नाही. मला या लोकांसोबत काम करणार नाही. येत्या २-३ दिवसांत मी लोकसभेच्या निवडणुकबाबतीत पुणेकरांशी बोलून चर्चा घेईन. मला पुणेकर जी भूमिका सांगतील त्यावर निर्णय घेईन असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्यासोबत अनेकजणांनी राजीनामे दिलेत. कुणीही कोणत्याही परिस्थिती राजीनामा देऊ नका. पक्ष संघटना सोडा असं मी कुणाला सांगितले नाही. प्रत्येकजण वैयक्तिक निर्णय घ्यायला सक्षम आहे. नेत्यांना ज्या गोष्टी पोहचवल्या जातात. त्यावर ते बोलतात. मनसेचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते. त्यामुळे मला सातत्याने कोअर कमिटीकडून विरोध होत होता. माझ्या सहकाऱ्यांसोबत एक तास चर्चा करून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या निर्णयावरून माघारी फिरणार नाही असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मी शरद पवारांची भेट घेतली, ती कात्रज मतदारसंघातील कामासाठी घेतली. ती कुठलीही राजकीय भूमिका नव्हती. गेल्या २-३ वर्षापासून माझ्यावर अन्याय सुरू होता. वारंवार माझ्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे केले. मी संघटना वाढीसाठी प्रयत्न केलेत. सामान्य महाराष्ट्र सैनिकांनाही विचारलं तर ते सांगतील. पण काहींना संघटना मजबूत करायची नाही. निवडणूक लढवायची नाही. पुणे शहरात मनसेची ताकद नाही. निवडणूक लढण्यासारखे वातावरण नाही असा चुकीचा अहवाल दिला. कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची होती परंतु नेत्यांनी चुकीचा अहवाल दिला असा आरोप वसंत मोरे यांनी केला.