"मी बाकी आयुष्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत घालवणार" - गजानन कीर्तिकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:31 PM2022-11-15T20:31:04+5:302022-11-15T20:31:37+5:30
मुख्यमंत्री आमचे होते तरी पण महाराष्ट्रातील आमच्या इतर आमदार आणि पदाधिकारी यांना कोणीही जुमानत नव्हते
पुणे : शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांचा आज पुणे येथे युवा सेनेच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला आहे. किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. ११ नोव्हेंबर ला शिंदे गटात सामील झालो. शिंदे पक्षातून गेले नंतर आम्हा खासदारांची बैठक घेतली, त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की राष्ट्रवादी सोबतची साथ सोडा. शिंदे यांची संघटना बळकट करण्याचं काम मी करतो असं शिंदेंना सांगितलं. माझा बाकी काही स्वार्थ नाही. बाकी आयुष्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मी घालवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
कीर्तिकर म्हणाले, अडीच वर्षांचं जे सरकार होत तेव्हा प्रशासकीय, पोलीस अधिकारी जुमानत नव्हते. अशावेळी रा काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं वर्चस्व होत. रोहित पवार यांनी त्यांच्या मतदार संघात त्यांना आवडतील, त्यांच्या मर्जीने हाताखाली काम करतील असे अधिकारी ठेवले होते. २००४ ज्या विधानसभा निवडणुक लढत होतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. पण बाळासाहेब यांनी सांगितलं की मी बँकेतील नोकरी सोडून आलो आहे. त्यामुळे मला तिकीट देण्यात आलं.
११ नोव्हेंबर ला शिंदे गटात सामील झालो. एनसीपी सोबतचा प्रवास आपल्याला येणाऱ्या काळात धोकादायक ठरणार आहे. याच कारणामुळे आम्ही सगळे शिवसेना सोडलीये. मुख्यमंत्री आमचे होते. तरी पण महाराष्ट्रातील आमच्या इतर आमदार आणि पदाधिकारी यांना कोणीही जुमानत नव्हते. उलट राष्ट्रवादीला सगळी ताकद मिळत होती. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आम्हाला कळत होत्या. हे आम्ही उद्धव साहेबाना हे सांगत होतो.
एका सिने अभिनेत्याला काम करण्याची संधी दिली
माझं पुणे क्षेत्रातील अर्ध राहिलेलं काम आता शिंदे गटात राहून मी करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गट वाढवणार. मी काम करणार. पश्चिम महाराष्ट्र माझं काम काढून घेऊन एका सिने अभिनेत्याला काम करण्याची संधी दिली. असा टोमणा त्यांनी अमोल कोल्हे यांना यावेळी मारला आहे.
मी निष्ठावंत होतो म्हणून बंड केला
मी शिवसेनेसाठी भरपूर काम केलं. या संघटनेबद्दल प्रेम आपुलकीने काम केलं. काँग्रेसमधली बाई प्रियांका चतुर्वेदी यांना लोकसभा दिली. मी विरोधात नाहीये पण निर्णय प्रक्रिया कशी चालते ते सांगतोय. अडीच वर्षे पूर्ण होऊ द्यायचे होते. नंतर बोलायचं होतं. आधीच कसं म्हणून दिलं की भाजप पुढचे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देणार नाहीये. माझ्यावर अन्याय झाला नाही. तोंड दाबून बुक्याचा मार खात होतो. मी निष्ठावंत होतो म्हणून बंड केला. काँग्रेस महाराष्ट्रातून संपत चालली आहे. यांना पण जीवदान देण्याचं काम केलं. संजय निरुपम यांच्या सांगण्यावरून राजीनामा देणारा नाही. संजय निरुपम यांना पुढे मोठ्या मताधिक्याने हरवेन. त्यांनी विरोधात तर लढावं.
बाकी आमचं कौटुंबिक नातं नीट
अमोल कीर्तिकर माझा मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी आहे. तो निष्ठावंत आहे. स्वार्थी विचार त्याच्या मनात नाही. माझी इच्छा एकनाथ शिंदे सोबत जाण्याची आहे. मी असं म्हटल्यावर तो म्हणाला की उद्धव साहेब, आदित्य संकटात आहे. पण मी म्हटलं एकनाथ शिंदे बाळासाहेबाची शिवसेना यांचे विचारणे मला पटले म्हणून मी जातोय. पद्धतशीरपणे बोलून आम्ही दोघे वेगळं झालो आहे. बाकी आमचं कौटुंबिक नातं नीट आहे.