'मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार; मतभेद असले तरी मनभेद नाही', वसंत मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:03 PM2022-05-06T13:03:05+5:302022-05-06T13:15:10+5:30
पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते
पुणे : औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत. तसेच काही भागात त्यांच्याकडून पोलिसांना निवेदनही दिले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर आता मोरे यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासे केले आहेत.
मोरे म्हणाले, मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
शहर कार्यालयात फिरकलो नाही
मी पक्ष कार्यालयात गेलो नाही. मी नाराजी राज साहेबांसमोर मांडली आहे. शहरात मी सातत्याने १५ वर्षे फक्त मनसेचे काम केले. पक्षाला उभारी मिळवून दिली. परंतु कुठलंही विचार न करता माझे शहराध्यक्ष पद काढून घेतले. त्यानंतर साईनाथ बाबर शहराध्यक्ष बनवण्यात आले. तिकडे फटाके वाजवले गेले. त्यांनी उत्सव साजरा केला. पण माझ्याबद्दल कुठलंही विचार केला नाही. ही सगळी नाराजी मी राज साहेबांसमोर मांडणार आहे. वसंत मोरेंचं जे पोटात असत ते ओठावर असत. शहर म्हणून काय भूमिका करावी हे ते ठरवतील, मी माझ्य प्रभागात या सर्व गोष्टी केल्या आहेत. म्हणून पक्षासाठी काम करत राहिलो पण शहर कार्यालयात फिरकलो नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माझ्या प्रभागात नियम पाळले गेले
माझ्य प्रभागात एकूण ६ मशीद आहेत. त्यांच्या पदधिकाऱ्यांशी मी स्वात जाऊन बोललो आहे. त्यांनी मला सहकार्याची भूमिका दाखवली. आणि राज साहेबांच्या भूमिकेनंतर कायद्यप्रमाणे नियम पाळले आहेत.