'मी दंडाची रक्कम तुझ्याकडूनच घेणार', कारचालकाने वाहतूक महिला पोलिसाला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 11:31 AM2021-12-10T11:31:19+5:302021-12-10T11:31:29+5:30

प्रलंबित दंड भरण्यासाठी न थांबता निघून गेल्याने महिला पोलीस शिपायाने कारचालकावर १२०० रुपयांचे ई-चलन ऑनलाइन फाडले. त्यामुळे संतापलेल्या कारचालकाने वाहतूक महिला पोलीस शिपायाला धमकावले.

I will take the fine from you the driver threatened the traffic police in pune | 'मी दंडाची रक्कम तुझ्याकडूनच घेणार', कारचालकाने वाहतूक महिला पोलिसाला दिली धमकी

'मी दंडाची रक्कम तुझ्याकडूनच घेणार', कारचालकाने वाहतूक महिला पोलिसाला दिली धमकी

googlenewsNext

पुणे : प्रलंबित दंड भरण्यासाठी न थांबता निघून गेल्याने महिला पोलीस शिपायाने कारचालकावर १२०० रुपयांचे ई-चलन ऑनलाइन फाडले. त्यामुळे संतापलेल्या कारचालकाने वाहतूक महिला पोलीस शिपायाला धमकावले. तो पळून जाऊ लागल्यावर त्याला रोखण्यासाठी या कर्मचारी त्याच्या कारमध्ये बसल्या असताना त्याने कार न थांबविता त्यांना बेदरकारपणे फिरविले. विश्रांतवाडी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

वैभव जंगम (वय ३१, रा. तळवदे, सातारा) असे या कारचालकाचे नाव आहे. ही घटना येरवडा येथील चंद्रमा चौकात बुधवारी दुपारी १२ वाजता घडली.

याप्रकरणी वाहतूक शाखेच्या महिला पोलीस शिपाई यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या चंद्रमा चौकात कर्तव्यावर होत्या. चौकातून जाणाऱ्या कारचा फोटो काढून त्यांनी तो ई- चलन मशीनमध्ये घेतला असता त्यावर सहाशे रुपयांचा दंड असल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादी यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा कारचालक गाडी न थांबवता निघून गेला. त्यामुळे फिर्यादीने वाहनावर मोटार वाहन कायदा १८४, २४/२/१७७ प्रमाणे बाराशे रुपयांची ऑनलाइन पावती केली.

ही पावती कारचालकाला मोबाइलवर मिळाल्याने तो पुन्हा माघारी आला व त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिला शिपायाला एकेरी बोलत ‘का गं तुला कोणी अधिकार दिला माझ्या गाडीवर पावती टाकण्याचा आणि पावती कशाबद्दल टाकली ते सांग,’ असे बोलून मोठ्याने आरडाओरड केला. त्यावर फिर्यादी यांनी तुम्हाला काही तक्रार असेल तर वाहतूक विभागात जाऊन तक्रार करा, असे सांगितले. त्यावर त्याने “मी दंडाची रक्कम तुझ्याकडूनच घेऊन जाणार, असे बोलत अश्लील भाषा वापरून मी ‘हार्ट पेशंट’ आहे. मला काही झाल्यास तू जबाबदार राहशील” असे बोलत धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी त्याला येरवडा वाहतूक विभाग येथे घेऊन आल्या असता तो तेथून पळून जाऊ लागला. फिर्यादी या त्याच्या गाडीत बसलेल्या होत्या. तेव्हा त्याने गाडी न थांबवता चंद्रमा चौक, आंबेडकर चौक अशी फिरवून फिर्यादीच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी वैभव जंगम याला अटक केली आहे.

Web Title: I will take the fine from you the driver threatened the traffic police in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.