..मी मतदान करणार...तुम्ही!
By Admin | Published: October 13, 2014 12:35 AM2014-10-13T00:35:30+5:302014-10-13T00:35:30+5:30
मतदानाचा टक्का वाढावा, या साठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, नागरिकांकडून मतदानाचा संकल्प सोडण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे
पुणे : मतदानाचा टक्का वाढावा, या साठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, नागरिकांकडून मतदानाचा संकल्प सोडण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करण्यात येत असून, त्या माध्यमातून पालक मतदारांशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मतदानादिवशी सुट्टी असल्याने अनेक मतदार मतदानाचे कर्तव्य बजावण्याऐवजी सहलीची मजा लुटतात. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदाररथ तयार करण्यात आला असून, नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्प पत्राचे वाटप करण्यात येत असून, विद्यार्थी पालकांकडून ‘मी मतदान करणार’ असा संकल्प लिहून घेणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या जनजागृती मोहिमे अंतर्गत गावातील बाजार पेठ, रेल्वे स्टेशन, बस थांबे या ठिकाणी फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. महाविद्यालय, कॉलेजमध्ये युवकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने पथनाट्याद्वारे मतदान करा असे आवाहन करण्यात येत आहे. रेडिओ आणि टिव्हीवर जाहिराती देखील करण्यात आल्या आहेत.
या शिवाय महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध महिला संघटना, स्वयंसेवी सघटना व महिला बचत गटांशी संपर्क साधण्यात येत आहे. ‘मताची किंमत नाही घेणार, मत मात्र जरुर देणार’, जो दारु-साड्या-नोटा वाटणार मता पासून
दूर ठेवणार अशा उद््घोषणाच्या माध्यमातून मतदारांना योग्य व्यक्तीलाच मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)