आयसीसीआर, विद्यापीठ अफगाण विद्यार्थ्यांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:40+5:302021-08-22T04:13:40+5:30

पुणेः भारत आणि अफगाण यांच्यातील संबंध घनिष्ठ असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत ...

ICCR, University backed by Afghan students | आयसीसीआर, विद्यापीठ अफगाण विद्यार्थ्यांच्या पाठीशी

आयसीसीआर, विद्यापीठ अफगाण विद्यार्थ्यांच्या पाठीशी

Next

पुणेः भारत आणि अफगाण यांच्यातील संबंध घनिष्ठ असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी विद्यापीठ प्रशासन आणि इंडियन काैन्सिल फाॅर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) पूर्ण ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर आणि इंडियन काॅन्सिल फाॅर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी संयुक्तरीत्या दिली.

विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असलेल्या अफगाण विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरूंचे डाॅ. नितीन करमळकर यांची भेट घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, सरहद संस्थेचे संजय नहार, पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी कार्यालयाचे संचालक संजय ढोले उपस्थित होते. यावेळी अफगाण विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्यासाठी विद्यापीठाच्या अफगाण माजी विद्यार्थी संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या हेल्प-लाईनचे कुलगुरूंच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

पुणे विद्यापीठ आणि सरहद संस्था या सर्व कार्यात हातात हात घालून येत्या काळात काम करणार असल्याचे नमूद करून डाॅ. करमळकर म्हणाले की, कुठल्याही कारणास्तव विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील वसतिगृहात राहणे ज्या अफगाणी विद्यार्थ्यांना अवघड किंवा असुरक्षित वाटत असेल अशा अफगाण विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सेंटरच्या वसतिगृहात सोय करण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या पालकांकडून पैसे येत होते. परंतु, अफगाणमधील परिस्थिमुळे पैसे येणे बंद झाले आहे अशा विद्यार्थ्यांचा पुणे विद्यापीठ आणि आयसीसीआरतर्फे सहानभुतीपूर्वक विचार करण्यात येईल. तसेच त्यांना शुल्कात माफी किंवा शुल्कात सवलत देण्यासंदर्भात गांभीर्याने विचार केला जाईल. तसेच शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा कालावधी वाढविण्याबाबतही पुनर्विचार करता येईल.

विद्यार्थ्यांची व्हिसा प्रक्रिया सुलभ

आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी दूरध्वनीवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारत सरकार पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असून विद्यार्थ्यानी स्वतःला एकटे समजू नये. जे विद्यार्थी सुट्टीनिमित्त अफगाण गेले होते आणि ते तिकडे अडकून पडले आहेत, त्यांना भारतात येण्याच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधत त्यांची व्हिसा प्रक्रिया कशी सुलभ होईल, यादृष्टीने देखील पत्रव्यवहार करून यातून लवकर मार्ग काढला जाईल.

Web Title: ICCR, University backed by Afghan students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.