आयसीएसआयच्या परीक्षांचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:56+5:302021-02-26T04:16:56+5:30
पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) घेतलेल्या एक्झिक्युटिव्ह व प्रोफेशनल परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. २५) जाहीर ...
पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) घेतलेल्या एक्झिक्युटिव्ह व प्रोफेशनल परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. २५) जाहीर झाला. त्यात प्रोफेशनल परीक्षेत (जुना अभ्यासक्रम) औरंगाबाद येथील सुदर्शन महर्षी याने प्रथम क्रमांक पटकावला.
जुन्या अभ्यासक्रमावर आधारित एक्झिक्युटिव्ह परीक्षेत जयपूर येथील तन्मय अग्रवाल याने, तर नव्या अभ्यासक्रमानुसारच्या परीक्षेत इंदोर येथील आकांक्षा गुप्ता हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रोफेशनल परीक्षेत (जुना अभ्यासक्रम) सुदर्शन महर्षी याने, तर नव्या अभ्यासक्रमानुसार वापी येथील तनया ग्रोव्हर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
दरम्यान, आयसीएसआयतर्फे यापुढील एक्झिक्युटिव्ह व प्रोफेशनल परीक्षा येत्या १ ते १० जून २०२१ दरम्यान होतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या २५ मार्चपर्यंत नावनोंदणी करता येईल. जुन्या अभ्यासक्रमाच्या एक्झिक्युटिव्ह परीक्षेच्या पहिल्या मोड्युलमध्ये १५.२१ टक्के तर दुसऱ्या मोड्युलमध्ये २१.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नव्या अभ्यासक्रमानुसार घेलेल्या एक्झिक्युटिव्ह परीक्षेत पहिल्या मोड्युलमध्ये ८.२७ टक्के, तर दुसऱ्या मोड्युलमध्ये १५.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रोफेशनल परीक्षेच्या (जुना अभ्यासक्रम) पहिल्या मोड्युलमध्ये २७.८८ टक्के विद्यार्थी, दुसऱ्या मोड्युलमध्ये २८.२६ टक्के विद्यार्थी तर तिसऱ्या मोड्युलमध्ये ३३.३७ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. प्रोफेशनल परीक्षेच्या (नवा अभ्यासक्रम) पहिल्या मोड्युलमध्ये १९.३९ टक्के, दुसऱ्या मोड्युलमध्ये १७.८१ टक्के, तर तिसऱ्या मोड्युलमध्ये ३४.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती आयसीएसआयच्या पुणे शाखेचे अध्यक्ष हर्षल जोशी यांनी दिली.