जिल्ह्यात लहान मुलांसाठी ७ हजार ९३९ बेडसह आयसीयू, व्हेंटिलेटर्स बेड तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:52+5:302021-05-31T04:09:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्याप्रमाणात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याची शक्यता सर्वच आरोग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्याप्रमाणात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याची शक्यता सर्वच आरोग्य यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, आतापर्यंत जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात केवळ लहान मुलांसाठी तब्बल ७ हजार ९३९ बेडची तयारी करून ठेवली आहे. यात ५२८ आयसीयू बेड असून १८३ व्हेंटिलेटर्स बेडचा समावेश आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग आढळून येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी लहान बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात सरकारी हाॅस्पिटलसह खासगी हाॅस्पिटलमध्ये देखील लहान मुलांच्या उपचारांची सर्व तयारी सुरू आहे. यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर्ससह आवश्यक डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती देखील करण्यात येत आहे.
------------
तिसऱ्या लाटेचा धोका कोणाला ?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना अधिक फटका बसला होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत तरुणाईच्या गटाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. ही लाट सर्वांत अधिक घातक ठरत गेली. त्यानंतर आता तिसरी लाट आली तर ती लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी प्रशासन दंग आहे. आतापर्यंत लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ते कोरोनाचे बळी पडत नाहीत, असे बोलले गेले.
-------
लहान मुलांसाठी अशी तयारी
कार्यक्षेत्र एकूण बेड आयसीयू बेड व्हेंटिलेटर्स
पुणे मनपा ५९७१ २५२ ८२
पिंपरी-चिंचवड १६९१ १३८ ६६
ग्रामीण २७७ ----- ३५