छत्रपती शिवाजीमहाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणा देणारे - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:23 PM2019-02-19T23:23:27+5:302019-02-19T23:27:23+5:30
शरद पवार : युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही
लोणी काळभोर : शिवछत्रपती महाराजांचे विचार हे संपूर्ण मानवजात व समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे समाजातील प्रत्येक घटकासाठी केले जाईल. अशा वेळेस आपण गैरसमज काढून टाकले पाहिजेत. युगा युगामध्ये एखादीच व्यक्ती अशी जन्माला येते. त्यामुळे या युगपुरूषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.
शिवजयंतीच्या दिवशी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे व एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्यातर्फे संपूर्ण जगातील एकमेवाद्वितीय असा एक महान आदर्श जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरूष व संपूर्ण जगासमोर इतिहास घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्?वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात, विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर हे होते. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व आमदार बाबूराव पाचर्णे आणि जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव उपस्थित होते. प्रा. रा हुल विश्वनाथ कराड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.