टाकाऊतून टिकाऊ’चा कानमंत्र!, कपड्यांपासून वस्तूंची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 07:14 PM2018-04-18T19:14:17+5:302018-04-18T19:14:17+5:30

टॉयलेट पेपरचे रोल, रिकामी दो-यांची रिळे, वर्तमानपत्रे, कपड्यांचे तुकडे, कुल्फीच्या काड्या आदी साहित्य वापरुन अनोख्या बाहुल्या तयार केल्या जात आहेत.

The idea of ​​'long time useful from waste!' | टाकाऊतून टिकाऊ’चा कानमंत्र!, कपड्यांपासून वस्तूंची निर्मिती

टाकाऊतून टिकाऊ’चा कानमंत्र!, कपड्यांपासून वस्तूंची निर्मिती

Next
ठळक मुद्देबाहुल्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही यशस्वी प्रयत्न जुन्या कपड्यांचा कचरा थांबवण्यासाठी इको रिगेन या संस्थेचा पुढाकार

पुणे : प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर, जमिनीमध्ये विघटन होत नसल्याने होणारी पर्यावरणाची हानी, आजूबाजूला वाढणारे कच-याचे ढीग ही सध्याची डोकेदुखी बनली आहे. यावर उपाय म्हणून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा कानमंत्र शहरात प्रत्यक्षात उतरवला जात आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करुन बाहुल्या आणि जुन्या कपडयांपासून वस्तू बनवण्याचा फंडा अवलंबला जात आहे.
पुण्यातील उद्योजिका लता तुम्मुरु यांच्यातर्फे कचरा आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीतून बाहुल्या बनवण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेमध्ये ४० वर्षांपासून या क्षेत्रात काम करणा-या दिल्लीतील शीला चौधरी यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. टॉयलेट पेपरचे रोल, रिकामी दो-यांची रिळे, वर्तमानपत्रे, कपड्यांचे तुकडे, कुल्फीच्या काड्या आदी साहित्य वापरुन अनोख्या बाहुल्या तयार केल्या जात आहेत. बाहुल्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.
‘लोकमत’शी बोलताना तुम्मुरु म्हणाल्या, ‘सध्याच्या जमान्यात आपल्याला सर्व काही नवीन हवे असते. मात्र, जुने ते सोने हा कानमंत्र नेहमी लक्षात ठेवायला हवा. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचा कल्पकतेने वापर करुन नवीन वस्तूंच्या स्वरुपात त्यास मूर्त रुप देता येऊ शकते. प्लास्टिक, थर्माकोल अशा वस्तूंमुळे कच-याचे ढीग वाढतात आणि पर्यावरणाची हानी होते. हानी रोखण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करुन टिकाऊ वस्तू तयार करता येऊ शकतात. पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीतून तयार झालेल्या आकर्षक बाहुल्या घराची शोभा वाढवतात. दोन दिवसांच्या कार्यशाळेत सुमारे ५० जणांची सहभाग घेतला.’
प्लास्टिकप्रमाणेच जुन्या कपड्यांचा कचरा ही मोठी समस्या आ वासून उभी आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार, उ्घड्यावर टाकलेल्या जुन्या कपड्यांचा कचरा कुजून त्यातून कार्बन डाय आॅक्साईड आणि मिथेनची निर्मिती होते. मिथेनमधून उष्णता उत्सर्जित झाल्याने तापमान वाढीस हातभार लागतो. या जुन्या कपड्यांचा कचरा थांबवण्यासाठी इको रिगेन या संस्थेने पुढाकार घेतला आहे. 
जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तूंची निर्मिती करण्यासाठी संस्था सरसावली आहे. दोन वर्षांपासून लोकांकडून जुने कपडे गोळा करण्यात येत असून, त्यावर प्रक्रिया करुन हँड बॅग, कॅरी बॅग, विद्यार्थ्यांसाठी सॅक, लॅपटॉप बॅग, प्रवासी बॅग, स्वयंपाकघरातील वस्तू आदींची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून पर्यावरणाचा -हास रोखण्यासह समाजातील दुर्बल घटकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे इको रिगेनचे संचालक स्वप्नील जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The idea of ​​'long time useful from waste!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे