कोरोना काळातील आदर्श सोसायटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:58+5:302021-06-17T04:07:58+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण सोसायटीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, दुसरी लाट ही संपूर्ण देशातच भयानक ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण सोसायटीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, दुसरी लाट ही संपूर्ण देशातच भयानक असल्यामुळे दुसऱ्या लाटेत सोसायटीमध्ये एकूण ४१ जणांना कोरोनाची लागण झाली. वाढते प्रमाण पाहता सोसायटीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु ह्या परिस्थितीला योग्यरीतीने हाताळून सोसायटी संचालकांनी सर्वांना विश्वासात घेऊन धीर देण्याचे काम केले. शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून रुग्णांना विलगीकरणात असताना त्यांची योग्य विचारपूस करत त्यांना धीर देण्याचे मोठे काम करण्यात आले.
दुसऱ्या लाटेत सोसायटीमध्ये पहिला रुग्ण ५ मार्च, तर शेवटचा रुग्ण हा २२ मे रोजी सापडला होता. त्यानंतर सोसायटीमध्ये कोणीही कोरोनाबाधित आढळले नसल्याची माहिती सोसायटीच्या वतीने देण्यात आली.
कोरोनाचा प्रतिकार करायचा असेल तर लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याने लसीकरण मोहीम राबवण्याचे कामही सोसायटीच्या वतीने करण्यात आले.
सोसायटीमध्ये पावणेदोनशेच्या वर कुटुंबे वास्तव्यास असून, त्यामध्ये ४५ वर्षांवरील १२० जणांपैकी ९५% जणांनी लस घेतली आहे. त्यामध्ये २१ जणांचे दोन्हीही डोस पूर्ण झाले आहेत. सोसायटीमध्ये एकूणच ४५ वर्षांवरील ९५% लोकांचे लसीकरण झाले असून, ज्यांना कोरोना होऊन गेला आणि ३ महिने पूर्ण झाले नाही, असेच फक्त लस घेण्याचे बाकी आहेत.
सोसायटीमध्ये लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अतुल दांगट आणि सुभाष नानेकर यांचीही मदत लाभली असल्याचे सोसायटी संचालकांनी सांगितले.