अंदाजपत्रकातील योजना विचारपूर्वकच आणल्या
By admin | Published: May 25, 2017 02:48 AM2017-05-25T02:48:10+5:302017-05-25T02:48:10+5:30
महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना अत्यंत विचारपूर्वक अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आहे. यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांचा प्रशासनावर अंकुश, वचक नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना अत्यंत विचारपूर्वक अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आहे. यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांचा प्रशासनावर अंकुश, वचक नव्हता. त्यामुळे अंदाजपत्रकांची योग्य पद्धतीने पूर्तता होत नव्हती. नावीन्यपूर्ण योजनांसह शहराच्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी भरीव तरतूद असलेला सन २०१७-१८चा तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचा अंदाजपत्रक सादर केला असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मोहोळ म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासूनच प्रशासनाची कार्यक्षमता कामाला लावली आहे. पुणेकरांनी टाकलेल्या विश्वासाला न्याय देत प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांसाठी पाच लाखांची अपघात विमा योजना, शहराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेजची उभारणी, विविध भागात योगा सेंटरची स्थापना, शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी कंडलिका-वरसगाव योजना, कचऱ्यापासून पुणेकरांची मुक्तता करण्यासाठी विविध उपाय-योजना, सर्वसामान्य पुणेकरांच्या मुलांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या सर्व शाळा ई-लर्निंग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. उत्पन्नाच्या स्रोतांचा विचार न करता बजेट फुगवल्याची टीका विरोधकांनी केली आहे. परंतु, सन २०१७-१८ चे गेल्या अनेक वर्षांपासून मिळकतकर, पाणीपट्टीची हजारो कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी याकडे कधीही गांर्भियाने लक्ष दिले नाही. यामुळे ही थकबाकी हजारो कोटींच्या घरात गेली. याच प्रमाणे शहराचा डीपी आता मंजूर झाला आहे. शहरातील बांधकामांची नियमावली तयार केली जाईल. यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल व उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल. याचबरोबर सध्या पेड एफएसआय ही नवीन संकल्पना आणत असून, यामधूनदेखील महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल. शासनाने एलबीटी बंद केल्याने महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठी घट होईल, असे विरोधकांचे म्हणने आहे.
परंतु, राज्य शासनाने जीएसटी विधेयक मंजूर करताना महापालिकांचे उत्पन्न कमी होणार नसल्याची हमी दिली आहे. याचबरोबर उत्पन्नाची इतर अनेक साधने, ज्याकडे विरोधकांनी कधी लक्षच दिले
नाही. आम्ही अशा प्रकारचे
उत्पन्नाचे सर्व लहान-मोठे स्रोत शोधून काढले आहेत.