आयडियाची कल्पना’ आणि ऑक्सिजनची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:23+5:302021-05-09T04:10:23+5:30

जम्बो रुग्णालयात एकूण ७०० रूग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त ५४०, आयसीयूच्या ६९ तर एचडीयूच्या १०० खाटा आहेत. ...

Idea’s idea and saving oxygen | आयडियाची कल्पना’ आणि ऑक्सिजनची बचत

आयडियाची कल्पना’ आणि ऑक्सिजनची बचत

Next

जम्बो रुग्णालयात एकूण ७०० रूग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त ५४०, आयसीयूच्या ६९ तर एचडीयूच्या १०० खाटा आहेत. दि.२० एप्रिल २०२१ पासून सीओईपी जम्बोमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. मागणी २३ टनांची आणि पुरवठा १३ टनांचा अशी स्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजन बचतीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्यासोबतच पुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

जम्बोचे समन्वयक आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची ऑक्सिजन बचतीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलून धरली. वैद्यकीय टीमच्या मदतीने सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. ज्या रुग्णांना ० ते २ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्या रुग्णांना नेसल कॅन्यूला सिस्टीमवर घेण्यात आले. तर, २ ते ६ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना सिंपल ऑक्सिजन मास्क लावण्यात आले. जे रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत आणि २४ तासांत कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता नसल्याचे आढळून आले, अशा रुग्णांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलमधील कोवीड केअर सेंटर येथे हलविण्यात आले.

उर्वरित दर दोन तीन रुग्णांच्या खाटांच्यामध्ये एक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आला. रूग्णांबाबत, प्रत्येकी ३ ते ४ रुग्णांमागे १ वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी नियुक्त करून १५ ते २० मिनिटांसाठी त्यांचा मास्क बाजूला काढून ऑक्सिजन पातळी ९४-९५ पर्यंत स्थिर राहील याचे नियोजन करण्यात आले. या कालावधीत त्यांच्यासाठी असलेला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. हा प्रयोग करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची सक्त देखरेख ठेवण्यात आली होती.

प्रत्येक रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा ''मॉनिटर'' करण्यात येत होता. अनेकांना अवघा ३ ते ५ लिटर/मिनिट असा ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत होता. या प्रक्रियेवर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होते. रात्रभर हा प्रयोग कोणत्याही रुग्णाला त्रास न होता सुरू होता. या प्रयोगामुळे एकाच रात्रीत तब्बल ८ टन ऑक्सिजन वाचला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या ऑक्सिजनची चिंता काही प्रमाणात कमी झाली. २१ एप्रिल रोजी सुरू झालेला हा प्रयोग अद्याप सुरू आहे. यामध्ये रुग्णांनी मोठे सहकार्य केले. रुग्णांनाही प्रसाधनगृहाला जाताना, जेवताना, आवश्यकता नसताना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याची सूचना देण्यात येतात. यासाठी स्पीकरद्वारे सतत सूचना देण्यात येतात. यासोबतच गॅस पाईपलाईनची सतत तपासणी आणि गळती थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न उपयोगी ठरले.

आता हाच प्रयोग विभागीय स्तरावर पश्चिम महाराष्ट्रात राबविण्याची हालचाल सुरू झाली आहे. शासनाला याबाबत सविस्तर अहवालही सादर झाला आहे. आतापर्यंत एकट्या जम्बो कोविड सेंटरमध्ये जवळपास १३० टन ऑक्सिजनची बचत झाली आहे. दिवसाला जिथे २३ टन ऑक्सिजन लागायचा तिथे १५ टनाची मागणी आहे.

ऑक्सिजन काळजीपूर्वक वापरण्याबद्दल रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नर्सेस व वॉर्डबॉय यांना दररोज प्रशिक्षण देण्यात येते आहे. अनावश्यक वापर होत नसल्याची खात्री तंत्रज्ञांकडून करण्यात येते.

- लक्ष्मण मोरे, वरिष्ठ वातार्हर/उपसंपादक, लोकमत पुणे

Web Title: Idea’s idea and saving oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.