आमचे हित ओळखून तरी सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, पुण्यात कलाकारांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 06:29 PM2020-09-16T18:29:00+5:302020-09-16T18:38:50+5:30
सरकारने कलाकारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा...
पुणे : गेल्या दिवसांपासून आम्ही हाल सहन करत आहोत. दुसरे व्यवसाय आणि नोकऱ्याही करुन पाहिल्या. पण, त्याला यश मिळालेले नाही. आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणूनच आता पुरे.. सरकारने कलाकारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा.असे म्हणत ’मी कलाकार मला न्याय कधी’....’माझा काय गुन्हा’..’कलाकारांचे हित ओळखा’.. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या...अशा आशयाचे फलक हातात घेवून बुधवारी कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्र लवकर सुरू करण्यासाठी सरकारला साद घातली. यावेळी कलाकारांचे प्रतिनिधित्व करत अभिनेते कुमार पाटोळे यांनी उपोषणाला सुरुवात केली. तसेच यावेळी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रातिनिधिक स्वरुपात आंदोलनही करण्यात आले.
कोरोनामुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकार व तंत्रज्ञ यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे कला आणि सांस्कृतिक क्षेत्र सुरु करण्यास सरकारने परवानगी द्यावी, यासाठी कुमार पाटोळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. पहिल्या दिवशी महा कलामंडलमधील कलाकारही यामध्ये सहभागी झाले. बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रातिनिधिक स्वरुपात आंदोलनही करण्यात आले. यावेळी मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, मंदार जोशी, अशोकराव जाधव हे उपस्थित होते.
कलाकार चंद्रा पवार म्हणाले, ऑकेस्ट्रापासून ते लावणी कलाकारपर्यंत सर्वांकडे काम नाही. आम्ही कजबाजारी झालो आहोत. आता काय करावे हा प्रश्न पडला आहे. बचतही संपली आहे. त्यामुळे जगण्यासाठी जवळ काहीही शिल्लक नाही. आमच्या जगण्याला सांस्कतिक कार्यक्रम सुरु करुन सरकारने आधार द्यावा.
कलाकारांची सरकारकडे नोंदणी व्हावी, कलाकार म्हणून शासनाचे अधिकृत ओळखपत्र कलाकारांना द्यावे, कलाकारांचा आरोग्य विमा काढावा आणि शासनाकडून प्रत्येक कलाकाराला निवृत्तीवेतन मिळावे, अशा सरकारकडे आम्ही मागण्या केल्या असल्याचे मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.
-----------