खाण्याच्या सोड्यात पीओपीच्या मूर्ती विरघळण्यास लागतो आठवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:58+5:302021-09-03T04:09:58+5:30
...त्यापेक्षा अमोनिअम बायकार्बोनेट उपयुक्त : मूर्तिकारांचे म्हणणे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा ...
...त्यापेक्षा अमोनिअम बायकार्बोनेट उपयुक्त : मूर्तिकारांचे म्हणणे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून विसर्जन हौदाची व्यवस्था होणार नाही हे गृहीतच आहे. ‘घरच्या घरी विसर्जन’ या मोहिमेलाच यंदाही बळ दिले जाणार आहे. त्यामुळे गणेशाचे आगमन होण्याआधीच ही मूर्ती शाडूची आणायची की पीओपीची, विसर्जन करायचे कशात याची चाचपणी गणेशभक्तांनी चालू केली आहे. यावर मूर्तिकारांचे म्हणणे असे की मातीची मूर्ती सहज विरघळते. मात्र मातीची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅॅरिस (पीओपी)च्या मूर्तीपेक्षा तुलनेने महाग असते. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीस प्राधान्य दिले जाते. मात्र पीओपीची मूर्ती खाण्याचा सोडा टाकलेल्या पाण्यात किंवा नुसत्या पाण्यातही विरघळण्यास अधिक काळ लागतो. त्यापेक्षा रसायनमिश्रित पाण्यात ती लवकर विरघळते असे मूर्तिकारांचे सांगणे आहे.
खाण्याचा सोडा टाकून घरीच पीओपीच्या मूर्ती विसर्जित करणे शक्य असले तरी मूर्तीच्या वजनाच्या समप्रमाणात खाण्याचा सोडा लागतो. तरी मूर्ती विरघळण्यास जवळपास आठवडा लागतो. त्या तुलनेत अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणात मूर्ती चार दिवसांत विरघळू शकते, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
पुण्यात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. प्राणप्रतिष्ठापनेसाठी सुबक, आकर्षक पीओपीच्या मूर्तींनाच मागणी अधिक असते. गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या मूर्तींकडे लोकांचा ओढा वाढला असला तरी हे प्रमाण अधिक नाही. माती पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने या मूर्ती तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भाविकांचा कल हा पीओपीच्या मूर्ती खरेदीकडेच अधिक असतो. यंदाही पीओपीच्या मूर्तींनाच सुमारे ५० ते ६० टक्के मागणी आहे. दरवर्षी गणेश मंडळे आणि घरगुती गणपती अशा जवळपास पाच लाख गणेशमूर्तींचे पुण्यात विसर्जन होते. त्यासाठी वीस लाखांपेक्षा अधिक भाविक विसर्जनासाठी रस्त्यावर उतरतात. यंदाही कोरोनामुळे घरच्या घरी मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना बादलीत मूर्ती विसर्जित कराव्या लागतील.
चौकट
“आमच्याकडे पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी खाण्याच्या सोड्याची मागणी होत नाही. खाण्याच्या सोड्याच्या किलोचा दर साठ रुपये आहे. मूर्ती विसर्जित करायची झाल्यास मूर्तीच्या वजनाच्या समप्रमाणात सोडा लागेल. त्यामुळे लोक तो खरेदी करण्याची शक्यता नाही.”
- सौरभ बाफना, व्यापारी
चौकट
“पीओपीची मूर्ती विसर्जित करायची झाल्यास अमोनिअम बायकार्बोनेटसारख्या रसायनाची गरज लागते. ते मूर्तीवर टाकल्यानंतर त्या मूर्तीमधील कॅॅल्शियम सल्फेट नष्ट होते आणि मूर्ती विघळू लागते. महापालिकेकडून पूर्वी हे रसायन उपलब्ध करून दिले जायचे.”
- राजेंद्र सराफ, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग
चौकट
“पीओपीची मूर्ती खाण्याच्या सोड्याने विरघळत नाही. मूर्ती जितक्या वजनाची असेल तर त्यापेक्षा अधिकच प्रमाणात खाण्याचा सोडा लागेल. घरची मूर्ती दोन फूटांची असेल तर घरच्या बादलीत मूर्ती विसर्जित करायची तर १२-१५ किलो सोडा लागू शकतो.”
-गणेश लांजेकर, मूर्तिकार