मुलगा झाला तर नाव एकनाथ! महिलेची पुण्यातील 'या' नेत्याच्या उमेदवारीसाठी पायी वारी, CM शिंदेंची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:41 PM2024-10-21T14:41:56+5:302024-10-21T14:43:24+5:30
लोकसभेची इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये, त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे
पुणे : महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपकडून कालच ९९ उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली. आता महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांचेही उमेदवारीकडे लक्ष लागून आहे. अशातच पुण्यातील एका नेत्याच्या उमेदवारीसाठी शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी पायी वारी करत मुंबईला निघाले आहेत. प्रमोद नाना भानगिरे असे त्या नेत्याचे नाव आहे. शिवसैनिकांपॆकी एका गरोदर महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालत भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती केली आहे. आमच्या विठ्ठलाने नानांना उमेदवारी दिली. आणि मला मुलगा झाला तर त्याचे नाव मी एकनाथ ठेवलं अशी भावनिक साद महिलेने घातली आहे.
मी शिवसेना हडपसर महिला आघाडी अध्यक्षा आहे. आज आम्ही नानासाठी काम करत आहोत. त्यांना हडपसर विधानसभेवर तिकीट मिळावे. यासाठी आम्ही आमचा विठ्ठल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडं घालण्यासाठी मुंबईला निघालो आहोत. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा विकास करत आहेत. त्याप्रमाणे नानाही हडपसरचा विकास करतील. त्यांनी एखाद्या वेळेस भाऊबिजेसाठी मला बोनस नाही दिला तरी चालेल. पण आमच्या नानांना उमेदवारी द्यावी. हि साहेबाना विनंती आहे, मला मुलगा झाला तर त्याच नाव नक्कीच एकनाथ ठेवलं. म्हणजे त्यांनी उमेदवारी दिली तर माझं सर्व सार्थक झाल्यासारखं होईल असं यावेळी महिलेने सांगितले आहे.
लोकसभेची इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे. पुण्यातील हडपसर विधानसभेत शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण आहे. नाना याठिकाणी नक्की निवडून येतील. ते हडपसरचा विकासही करतील. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंति आहे कि त्यांनी प्रमोद भानगिरे यांना तिकीट द्यावे असे शिवसैनिकांनी यावेळी सांगितले आहे.