गैरहजर राहिल्यास प्रतिदिन ५०० रुपये दंड, विद्यार्थ्यांच्या लुटीचा नवा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 05:24 AM2018-07-02T05:24:33+5:302018-07-02T05:24:39+5:30
गृहपाठ न केल्यास, केस कापून न आल्यास, नखे न कापल्यास, शाळेमध्ये भांडणे केल्यास अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळा दंड आकारण्याचा नवीन मार्ग वानवडीतील सनग्रेस या इंग्लिश मीडियम शाळेने शोधून काढला आहे.
पुणे : गृहपाठ न केल्यास, केस कापून न आल्यास, नखे न कापल्यास, शाळेमध्ये भांडणे केल्यास अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळा दंड आकारण्याचा नवीन मार्ग वानवडीतील सनग्रेस या इंग्लिश मीडियम शाळेने शोधून काढला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक दंड करता येत नसल्याने आर्थिक दंड करीत लुटीचा मार्ग या शाळेने शोधून काढला आहे. याविरुद्ध आप पालक युनियनकडून शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
सनग्रेस शाळेने शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांकडून एका पत्रकावर सही घेतली, त्यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल व फी परत केली जाणार नाही तसेच आठवड्यात अनुपस्थित राहिल्यास ५०० रुपये प्रतिदिवस प्रमाणे दंड करण्यात येईल, केस कापलेले नसल्यास (सोल्जर कट ) ५० रुपये दंड आकारला जाईल, अशा विविध अटी लिहिलेल्या कागदावर पालकांच्या सह्या घेण्यात आल्या.
शाळा सुरू झाल्यानंतर एक विद्यार्थी ६ दिवस त्याच्या वैयक्तिक कारणास्तव शाळेत हजर राहू शकला नाही. त्यानंतर तो शाळेत गेला असता त्याच्या पालकांना ३ हजार रुपये दंड म्हणून भरण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये शनिवार, रविवार, ईद या सुटीच्या दिवसांचाही दंड घेण्यात आला. त्याचबरोबर हा दंड भरल्याची पावतीही देण्यात आली नाही. या विद्यार्थ्याचे वडील वाहनचालक आहेत तर आई घरकाम करते.
आप पालक युनियनचे कार्यकर्ते सचिन आल्हाट पालकांसोबत शाळेमध्ये गेले असता, याबाबत
तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही, दंडाची रक्कम परत हवी असल्यास मुलास शाळेतून काढून टाकू, तुम्ही शाळा दाखला घेऊन जा, असे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे आता पालक मुलाची प्रवेश फी भरू शकत नसल्याने
आता घरी बसण्याशिवाय मुलाला पर्याय नाही.
संबंधित शाळेविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी
शिक्षण हक्क कायद्यानुसार शारीरिक शिक्षांवर बंदी आली. परंतु त्याबदल्यात सनग्रेस शाळेने शिक्षा म्हणून लागू केलेला आर्थिक दंडाचा चुकीचा प्रघात पाडला आहे. कॅपिटेशन फी कायद्याप्रमाणे इतर कोणत्याही स्वरूपात पालकांना दंड आकारणे चुकीचे आहे. या बाबत शिक्षण संचालकांनी तातडीने कारवाई करावी.
- मुकुंद किर्दत, आप