'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर...' उदयनराजेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:56 PM2022-11-28T15:56:49+5:302022-11-28T15:58:23+5:30

राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासोबतच महापुरुषांचा अपमान होणार नाही याबद्दलही कायदा करावा

If action is not taken against those who insult Shivaraya Udayanraj told the insulters | 'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर...' उदयनराजेंनी सुनावले

'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर...' उदयनराजेंनी सुनावले

Next

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घ्यावी अशी अनेकांनी भूमिका मांडली आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

उदयन राजे म्हणाले, ज्या ज्या वेळेस महाराजांची अवहेलना केली जाते..त्या त्या वेळी राग कसा येत नाही. सर्वच पक्षाचा मूळ अजेंडा हा शिवरायांचे विचार आहेत. तसं नसेल तर शिवरायांचे नाव तरी का घेता. भावी पिढीसमोर काय इतिहास ठेवणार. चुकीचा इतिहास ठेवला तर येणाऱ्या पिढीला हाच खरा इतिहास वाटेल. राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासोबतच महापुरुषांचा अपमान होणार नाही याबद्दलही कायदा करावा. इतिहासासोबत अशीच छेडछाड सुरू राहिली. तर भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार आहे.

तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का? 

शिवरायांचा महाराष्ट्र आहे. लोकशाहीतले राजे लोकं आहेत. त्यांनीच आता जागे व्हावे. लोकशाहीतले राजे कधी जागे होणार. शिवरायांची अवहेलना म्हणजे आपली अवहेलना, त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान. त्यांनीच आता जाब विचारावा. त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काहीतरी ठरवण्याची वेळ आली आहे. शिवजयंती तरी साजरी का करायची, शिवरायांचे पुतळे तरी का उभारायचे. जेव्हा त्यांचा अपमान होतो तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

काय म्हणाले होते राज्यपाल

आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

Web Title: If action is not taken against those who insult Shivaraya Udayanraj told the insulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.