इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही; मराठा, बहुजन समाजाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:46 IST2025-03-17T11:46:33+5:302025-03-17T11:46:59+5:30
स्वराज्याचे शिलेदार मैदानात उतरले असून शासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही; मराठा, बहुजन समाजाचा इशारा
धायरी : खबरदार..!! जर कोणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ऐतिहासिक राजघराणी आणि शिलेदार घराणी, मावळे यांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही. यासाठी १२ मावळ मुलखातील सर्व सरदार घराणी आणि मराठा बहुजन समाज पुण्यात एकवटला होता.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक या ठिकाणी रविवारी बैठक पार पडली. प्रदीप कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यासारख्या लोकांनी जी गरळ ओकली अशी गरळ ते किंवा इतर अन्य कोणी ओकल्यास सोडणार नाही, असा ठराव या बैठकीत सर्वानुमते संमत झाला. या विकृत दोघांवर कडक कारवाई करावी आणि अशा बदनामी परत होणार नाहीत, यासाठी कायदा पास करावा. तसेच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संशोधक आणि अभ्यासक यांच्या समितीमार्फत अधिकृत इतिहास प्रकाशित करावा व तोच शिक्षणामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये असावा.
मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेत आणि शाळेत हाच इतिहास शिकवावा आणि सेन्सॉरवर इतिहास संशोधक आणि अभ्यासकांची समिती असावी, असे ठराव करण्यात आले. येत्या महिनाभरात याबाबत शासनाला निवेदन देऊन, शासनाने या विषयाची गंभीर दखल घ्यावी. यासाठी पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्याचे ठरले. यावेळी १२ मावळांतील सर्व सरदार घराणी आणि बहुजन समाजातील लोक उपस्थित होते.