हजेरी कमी भरली तर नोकरी जाणार
By admin | Published: April 19, 2017 04:21 AM2017-04-19T04:21:37+5:302017-04-19T04:21:37+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये काम करणऱ्या चालक, वाहक व मॅकेनिकांना आता सुट्टयांचा आनंद जास्त लुटता येणार नाही
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये काम करणऱ्या चालक, वाहक व मॅकेनिकांना आता सुट्टयांचा आनंद जास्त लुटता येणार नाही. यापूर्वी ज्यांनी विनाकारण भरभरुन सुट्टया घेतल्या आहेत त्यांच्यावर देखील टांगती तलवार आहे.
पीएमपी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार जर कर्मचाऱ्यांची वार्षिक हजेरी २४० दिवसांपेक्षा कमी भरली तर त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात येईल.
आदेशाच्या अमंलबजावणीसाठी मुंडे यांनी जुने हजेरी रेकॉर्डही मागविले आहेत. त्यामुळे यापूर्वी घेतलेल्या जादा सुट्याही भविष्यात त्रासदायक ठरणार आहेत. तसेच या आदेशाच्या अमंलबजावणीत क दिरंगाई आढळल्यास संबंधितांवरही कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत.
सर्व डेपो मॅनेजरकडून गैरहजर सेवकांची माहिती मागविण्यात येणार आहे. त्या सेवकांना आपली बाजू मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वार्षिक हजेरी २४० पेक्षा कमी असणाऱ्या सेवकांची संख्या जवळपास १५० आहे. त्यामुळे या सर्वांवर आता नोकरीतून
बडतर्फ होण्याची टांगती तलवार घेऊन प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)