बारामती-फलटण रस्ता न झाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा होणार रद्द
By Admin | Published: May 21, 2017 03:52 AM2017-05-21T03:52:15+5:302017-05-21T03:52:15+5:30
बारामती-फलटण रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतात न येण्याचा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : बारामती-फलटण रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतात न येण्याचा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.
यामुळे हा रस्ता शासनाने दुरुस्त करावा असा उपहासात्मक संदेश सध्या या रस्त्याच्या दुरवस्थेचे वास्तव सोशल मीडियावरून गाजत आहे. सोशल मीडियाच्या खिल्लीमुळे गेल्या सात वर्षांपासून रस्त्याच्या रखडलेल्या कामावर स्थानिकांनी बोट ठेवले असले तरी प्रशासकीय उदासीनता यामुळे पुन्हा आणखी पुढे आली आहे.
वरकरणी जरी हा विनोद वाटत असला तरी मागील सात वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबत शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे. वारंवार बारामती-फलटण रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत वृत्त प्रसिद्ध झाले
आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. सांगवी-बारामती रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. दर महिन्याला या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. रस्त्यावर पडलेले खड्डे खडी व डांबर टाकून बुजविण्यात येतात. मात्र, पुढील पंधरा
दिवसांमध्ये रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे होते.
त्यामुळे दर महिन्याला लाखो रुपये खड्ड्यात जात आहेत. बारामती-फलटण हा राज्य महामार्ग असल्याने पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्याने होत असते. वाहनांची वर्दळ जास्त असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची संख्याही वाढत आहे. ५ ते ६ फुटांहून अधिक मोठ-मोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. सांगवी, अठरा फाटा (शिरवली), काळा ओढा,
बावीस फाटा, पाहुणेवाडी, गवारफाटा आदी भागात मोठ्या प्रमाणावर
ड्डे आहेत.
वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. रखडलेल्या कामामुळे अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज या रस्त्यावर किरकोळ अपघात ठरलेलेच असतात.
या रस्त्याने दररोज प्रवास करणारे नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार जीव मुठीत घेऊनच प्रवास करतात. खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
प्रशासनाला अद्याप जाग नाही
बारामती-फलटण रस्त्याच्या कमासाठी राजकीय पक्षांनी वारंवार आंदोलने केली. अनेक संस्था संघटनांनीही हा प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून समोर मांडला. मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यामुळे वैतागलेल्या नागरिक व प्रवाशांनी आता सोशल मीडियातून या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
या रस्त्यावर सांगवी या ठिकाणी नीरा नदीवर मोठा पूल आहे. हा पूल सातारा-पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून ओळखला जातो. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तसेच पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. शिरवलीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा फुगवटा या पुलापर्यंत येतो. तसेच या ठिकाणी नदीपात्र रुंद आहे. परिणामी वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक आहे.