बस बंद पडल्यास वाहकाला भुर्दंड
By admin | Published: July 28, 2014 04:41 AM2014-07-28T04:41:44+5:302014-07-28T04:41:44+5:30
मालकीच्या बस बंद ठेवून ठेकेदाराकडील बस रस्त्यावर उतरविण्यास पीएमपीकडून प्राधान्य दिले आहे
पुणे : मालकीच्या बस बंद ठेवून ठेकेदाराकडील बस रस्त्यावर उतरविण्यास पीएमपीकडून प्राधान्य दिले आहे. आता भाडेतत्त्वावरील बस बंद पडल्यास पीएमपीच्या वाहकाला त्याचे ड्युटीचे तास कमी करून डेपोमध्ये पाठविण्यात येणार आहे. याचप्रमाणे बसच्या खेपा रद्द झाल्यास गॅरेज सुपरवायझर, स्थानकप्रमुख तसेच स्टार्टर सेवकाला जबाबदार धरण्यात येणार असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
भाडेतत्त्वावरील बसेस गॅस भरण्याकरिता गेल्याने अनेकदा खेपा रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय व खात्याचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे डेपोमधील सुपरवायझरनी भाडेतत्त्वावरील दैनंदिन १० बसेसची समक्ष तपासणी करावी, असे कार्यालयीन परिपत्रक काढण्यात आले आहे.
भाडेतत्त्वावर बस दिल्यानंतर पीएमपीकडून ठेकेदाराला ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे ठेकेदाराने पीएमपीची देखभाल करणे, चालक पाठविणे यांसारखी बसबाबतची कामे करणे आवश्यक आहे. बस बंद पडल्यास ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बस बंद पडल्यास पीएमपीकडील वाहकाचे ड्युटीचे तास कमी का करणार आणि सुपरवायझरवर कारवाई का करणार, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.