रस्त्यात बस बंद पडली तर हाेऊ शकताे पाच हजाराचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 06:17 PM2019-04-27T18:17:05+5:302019-04-27T18:18:13+5:30
वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात येत असून या बसेस लवकरात लवकर न हटवल्यास पाच हजार रुपयांचा दंड पाेलीस आकारत आहेत.
पुणे : पीएमपीच्या बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. या बंद पडलेल्या बसेसमुळे वाहतूकीची काेंडी हाेत असते. याचा वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागताे. वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात येत असून या बसेस लवकरात लवकर न हटवल्यास पाच हजार रुपयांचा दंड पाेलीस आकारत आहेत. या पद्धतीच्या कारवाईला पाेलिसांनी सुरुवात केली आहे.
पुण्याची वाहनसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राेज सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला वाहतूक काेंडी हाेत असते. त्यातच शहरात विविध ठिकाणी मेट्राेची तसेच इतर विकासकामे सुरु असल्याने वाहतूक संथ झाली आहे. अशातच पीएमपी बस रस्त्यात बंद पडल्यास वाहतूकीची माेठ्याप्रमाणावर काेंडी हाेत असते. पीएमपीच्या अनेक बसेस या 10 - 15 वर्ष जुन्या असल्याने त्या सातत्याने मार्गावर बंद पडत असतात. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे देखील बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. बसेसची याेग्य देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याचे कारणही बस मार्गावर बंद पडण्यामागे आहे. अशातच आता अर्ध्यातासाहून अधिक काळ बस रस्त्यात बंद पडल्यास वाहतूक पाेलिसांकडून 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड पीएमपी बराेबरच इतर खासगी बसेस व जड वाहनांना लागू हाेत असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, अनेकदा बसेस मार्गावर रस्त्याच्या मध्येच बंद पडल्याने वाहतूकीची काेंडी हाेत असते. बस रस्त्याच्या कडेला बंद पडली असेल आणि ती वाहतूकीस अडथळा ठरत नसेल तर वाहतूक पाेलीस कारवाई करत नाहीत. परंतु अनेकदा बस या रस्त्याच्या मध्येच बंद पडतात. त्यामुळे वाहतूक काेंडी हाेते. त्यामुळे रस्त्यात बस बंद पडली आणि ती जर अर्ध्यातासात तेथून न हलविल्यास पाच हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. हा नियम केवळ पीएमपीसाठी नाही तर इतर सर्वच बसेससाठी आहे.