जल्लोष तर महत्त्वाचाच, नियमांचे व्हावे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:20 AM2018-08-31T00:20:28+5:302018-08-31T00:20:49+5:30

गणेशोत्सवामध्ये विद्युत अपघात टाळण्यासाठी असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याला सार्वजनिक गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो देखील

 If the celebration is important, the rules should be followed | जल्लोष तर महत्त्वाचाच, नियमांचे व्हावे पालन

जल्लोष तर महत्त्वाचाच, नियमांचे व्हावे पालन

Next

गणेशोत्सवामध्ये विद्युत अपघात टाळण्यासाठी असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याला सार्वजनिक गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो देखील. मात्र अद्याप सर्वच गणेशमंडळांकडून विद्युत रोषणाई करतानाची काळजी योग्य त्या पद्धतीने घेतली जात नाही. गणेशोत्सवात तात्पुरत्या काळासाठी विद्युतसंच मांडणी म्हणजेच जे काही नवीन विद्युत कनेक्शन घेतली जातात त्याविषयी गांभीर्य आणि सावधानता बाळगण्यात कार्यकर्ते अपयशी ठरतात. शेवटी याचा गंभीर परिणाम म्हणजे अपघाताला सामोरे जावे लागणे.

वीजसंच मांडणीचे काम परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घेणे हे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या २0१0च्या नियमाच्या कलम २९ नुसार बंधनकारक केले असताना अनेकांकडून कायद्याचे पालन केले जात नाही. शहरात काही प्रमाणात नियमांचे पालन होताना दिसते. मात्र ग्रामीण भागात बऱ्याच वेळा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मनमानी सहन करावी लागते. यासगळ्यात काही जणांना पैसे देऊन विद्युत जोडणीची कामे करून घेऊन तात्पुरत्या पद्धतीने प्रश्न सोडविण्यावर भर दिला जातो. मुळातच तात्पुरत्या वीज जोडणीसाठी महावितरण विभागाकडून अधिकृत पद्धतीने वीज घेणे गरजेचे आहे. कायद्याने ते बंधनकारकदेखील आहे. एकूणच ते सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु आपल्याकडे नियमांना डावलून त्यांना धाब्यावर बसवून कामे करून घेण्यास प्राधान्यक्रम दिला जातो. परिणामी उत्सवादरम्यान सर्वांच्या जिवाला धोका निर्माण होतो.
‘इकॅम’च्या वतीने केवळ पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील सर्व गणेश मंडळांना सुरक्षेच्या कारणास्तव आवाहन करण्यात येते. या आवाहनाच्या माध्यमातून संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांना आयएसआय मार्क विद्युत साहित्याचा वापर करण्यास प्राधान्यक्रम द्यावा. अशी सूचना देण्यात येते. अनेकदा उत्सवादरम्यान निकृष्ट दर्जाच्या वस्तू वापरल्याने नुकसान व अपघाताला सामोरे जावे लागल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. मेनस्वीच बरोबर ईएलसीबीचा (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) वापर करण्याच्या सूचना दिल्या जातात. फ्युजऐवजी एमसीबीचा (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापर करावा, मंडपाच्या पत्र्याजवळ, खांबाजवळ, वायरिंग उघड्या स्थितीत नसावी. याबरोबरच वायरिंग पीव्हीसी पाईपमधूनच करावे, आर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी, ती नसल्यास नवीन आर्थिंग करून घ्यावी, स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड अथवा लाकडी फळी लावावी, जेणेकरून स्वीच टर्मिनल उघडी राहून कोणाला शॉक बसणार नाही. स्वीचबोर्ड अथवा वायरिंग लहान मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा महत्त्वाच्या सूचनांकडेच दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अपघाताला सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. स्वीच बोर्ड लहान मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी. ही सूचना केवळ घरातील विद्युत जोडणी करण्यापुरतीच मर्यादित नसून गणेशोत्सवादरम्यान कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. पावसापासून वीज संचमांडणी सुरक्षित कशी राहील याकडे बहुतांशी दुर्लक्ष केले जाते.
पावसाळी दिवसात येणाºया उत्सवादरम्यान अनुचित प्रकार टाळण्याकरिता योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. विविध कनेक्शनकरिता वायरला जोड दिले जातात. तसे दिल्यास पीव्हीसी इन्सुलेशन टेपचा वापर करावा आणि मंडपासाठी खोदाई करताना तेथे पूर्वीची कोणती केबल आहे का, याबाबतची माहिती महावितरण विभागाकडून घ्यावी.

गणेशोत्सवाच्या तयारीची गडबड सुरू असल्याचे दृश्य सर्वत्र   पाहावयास मिळतेय. लाडक्या गणरायाच्या आगमनाकरिता मोठ्या भक्तिभावाने त्याच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबरच सर्व भक्तांच्या सुरक्षेसाठी विद्युतविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. उत्सव नेहमीचा असून त्याकरिता आपल्या जिवाशी खेळणे उचित नाही. असे मत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरर्स असोशिएशन आॅफ महाराष्ट्र पुणे विभागाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव तयारीनिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
 

Web Title:  If the celebration is important, the rules should be followed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे