मुलगा मोबाइल पाहत जेवत असेल तर होईल हार्मोन्सवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:43+5:302021-07-02T04:08:43+5:30
तुमची मुले माबाईलवर गेम्स खेळता खेळता जेवण करतो? मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीशिवाय जेवण करतच नाही? काय तो स्क्रीन एडिक्ट झालाय? ...
तुमची मुले माबाईलवर गेम्स खेळता खेळता जेवण करतो? मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीशिवाय जेवण करतच नाही?
काय तो स्क्रीन एडिक्ट झालाय? तर मग आत्ताच सावध व्हा. कारण डॉक्टरांच्या मते ही सवयीमुळे मुलांमध्ये स्थूलता निर्माण करते किंवा त्याचे वजन कमालीचे घटवते. त्यामुळे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना तरी जेवण करताना स्क्रीन पाहणे सक्तीने टाळायलाच हवे.
---
साडेतीन वर्षांचा सोहम पोटभर खात नाही म्हणून त्याची मम्मी त्याला मोबाईलवर विविध गोष्टी व्हिडीओ दाखवत जेवू घालायची. मोबाईल पाहण्याच्या नादाता तो थोडं जास्त जेवतो म्हणून त्याच्या मम्मीने ही युक्ती लढवली खरी, मात्र पुढे त्याला मोबाईलची इतकी सवय लागली की त्याला आता जेवताना मोबाईल नसेल तर जेवणच करत नाही. एकीकडे हा हट्टीपणा असताना दुसरीकडे त्याचे वचनही कमालीचे घटत चालले त्यामुळे अखेर त्याला डॉक्टरांकडे नेल्यावर कळाले की त्याच्या हार्मोन्सवर परिणाम झाला आणि त्याच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जेवणात त्याचं लक्ष नाही.
सोहमसारखीच सवय तुमच्याही मुलांना लागली असेल तर ती सवय तोडण्यासाठी तातडीने बदला अन्यथा ते मुलांच्या डोळ्यांसाठी जसे घातक आहे तसेच त्याच्या हार्मोन्सवरही परिणाम करणारे आहेत. त्यामुळे मुलाचे मानसिक आणि शारीरिक संतुलनावर विपरीत परिणाम होणार आहेत, असे डॉक्टरांचे मत आहे. डॉ. संजय क्षीरसागर यांच्या मते मुले जेव्हा मोबाईल पाहण्यात गुंग होतात तेंव्हा त्यांना भुकेचा अंदाज येत नाही, त्यांची भूक भागली तरी ते खात राहतात किंवा भूक असली तरी आणखी मागायचं लक्षात येत नाही शिवाय आपण काय खातोय त्याची टेस्ट कशी आहे त्याची तृप्ती कशी मिळते या कोणत्याच गोष्टींकडे त्यांच लक्ष नसतं आणि परिणामी मुलांच्या विकास वाढीवर त्याचा परिणाम होतो.
--
शारीरिक विकास करणाऱ्या होर्मोन्सवर परिणाम
एका बालरुग्णाच्या केसबाबत बोलताना डॉ. नीलिमा क्षीरसागर म्हणाल्या की, साधारण सात वर्षांच्या ओंकारचा चिडचिडेपणा प्रचंड वाढला होता. विशेषत: रात्रीच्या वेळी त्याच्या चिडचिडेपणामध्ये प्रचंड वाढ होती. त्यांच्या पालकांशी बोलल्यानंतर कळाले की, त्याला अनेक दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत टीव्हीवर कार्टुन्स पाहायची सवय होती, त्यामुळे सकाळी तो उशिरा उठायचा. या प्रकाराला डॉ. ‘काऊंटर प्रोडक्टिव’ म्हणतात. सर्व इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांमधून एक ब्लू लाईट बाहेर येतात जे थेट ल्सीम हार्मोन मेलाटोनिनवर दबाव टाकतत. वास्तविक शरीरातील हार्मोन्स रात्रीच्यावेळी जास्त ॲक्टिव असतात. मुले रात्रीच्या वेळी खूप वेळ जागी राहिली तर हार्मोन्सवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे शारीरिक विकास व्यवस्थित होत नाही. जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत पाचही इंद्रियांचा विकास झपाट्याने होत असतो. ज्यामध्ये पाहणे, ऐकणे, स्पर्शाची जाणीव, गंध घेण्याची क्षणता आणि चव कळण्याची क्षमता विकसित होते. परंतु मोबाईल किंवा टीव्हीसारख्या माध्यमांचा अतिरेकामुळे या इंद्रियांच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या शाॅर्ट आणि लॉंग टर्म व्याधी निर्माण होतात. शॉर्ट टर्म व्याधींमध्ये रात्रीच्या वेळी चिडचिडेपणा तर लॉंग टर्ममध्ये मन एकाग्र होणे, लक्षात विचलीत होणे यासह शाळेतील ॲक्टिव राहण्यावरही परिणाम होतो.
------
स्क्रीन ॲडिक्शन सोडविण्यासाठी हे करता येईल
- मोबाईल आणि टीव्हीची एक वेळ ठरवा व ती सक्तीने पाळा.
- जेवताना आणि झोपण्याआधी मुलांना फोन अजिबात देऊ नका, त्या दरम्यान त्यांच्याशी गप्पा मारा.
- मुलांसाठी जे नियम ठरवाल ते स्वत:ही पाळा.
- मुलांसाठी स्टोरी टेलींग, बोर्ड गेम्स, मैदानी खेळ आदी खेळात बिझी ठेवावे.
- मुलांना कोणत्याही कामासाठी, अभ्यासासाठी मोबाईल देण्याचे आमिष दाखवू नका.
---------
दीपक होमकर