प्राण गेला तरी मागे हटणार नाही
By admin | Published: July 28, 2014 04:42 AM2014-07-28T04:42:31+5:302014-07-28T04:42:31+5:30
राज्यघटनेतच धनगर समाजाला हक्काचे आरक्षण दिले आहे. ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच आहेत, असे राज्य सरकारने मान्य केले आहे
बारामती : राज्यघटनेतच धनगर समाजाला हक्काचे आरक्षण दिले आहे. ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच आहेत, असे राज्य सरकारने मान्य केले आहे. परंतु, राज्य सरकारची भूमिका दुटप्पी आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी प्राण गेला तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आज तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती कमालीची खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणांचा उद्रेक वाढत असताना उपोषणकर्त्यांनीच आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे वातावरण शांत झाले.
धनगर आरक्षण कृती समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा ठरणार आहे. उपोषणकर्त्यांनी मात्र कार्यकर्त्यांनी आग्रह करूनदेखील उपोषण मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सुकाणू समितीच्या (कोअर कमिटी) सदस्यांवर देखील संताप व्यक्त केला. आतापर्यंत उपोषण केलेल्यांचे उपोषण मागे घेऊन कोअर कमिटीच्या सदस्यांनी उपोषणाला बसावे, अशी प्रतिक्रिया तरुणांमध्ये उमटत होती. हजारोच्या संख्येने आलेल्या तरुणांच्या जमावाला शांत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत होते. अखेर उपोषणकर्त्यांनीच मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
कृती समितीचे नेते हनुमंत सूळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, प्रमुख खात्यांचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी रात्री झालेल्या चर्चेची माहिती दिली. गेल्या ६ दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू असताना शासनाचा जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही. सरकारची भूमिका आता फसवणुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. वेळकाढूपणा केला जात आहे. अगोदर झालेल्या बैठकीत २ दिवसांची मुदत मागितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ८ दिवसांची मुदत मागितली. एकूणच आरक्षणाच्या अंमलबजावणीवर संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत. (प्रतिनिधी)