‘दशक्रिया’ प्रदर्शित न झाल्यास राष्ट्रीय पुरस्काराचा अवमान; संदीप पाटील चित्रपट प्रदर्शनावर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 04:09 PM2017-11-16T16:09:29+5:302017-11-16T16:13:31+5:30
‘दशक्रिया’ चित्रपट न पाहताच त्यावर टीकेची राळ ओढणार्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमिअरला निमंत्रण दिले आहे.
पुणे : ‘दशक्रिया’ चित्रपट न पाहताच त्यावर टीकेची राळ ओढणार्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमिअरला निमंत्रण दिले आहे. मात्र महासंघाने नकार दर्शवित पुण्यातील सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना उद्या (शुक्रवारी) हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासंबंधी निवेदन देत आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे. पुणे, मुंबई आणि गोव्यामधील महोत्सवामध्ये या चित्रपटाचे पूर्वीच दोन शो झाले आहेत तेव्हा ब्राम्हण महासंघ झोपला होता का? तेव्हा का नाही चित्रपटाला विरोध दर्शविला? असा सवालही दिग्दर्शकाने उपस्थित केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित केला नाही तर राट्रीय पुरस्काराचा अवमान ठरू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
‘दशक्रिया’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘ब्राम्हण लोक स्वत: चे पोट भरण्यासाठी दशक्रिया विधी करतात’ अशी खोचक टिप्पणी करीत ब्राम्हणांसह हिंदू धर्मालाच टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी करीत गुरूवारी सिटीप्राईडसह ई-स्क्वेअर, आयनॉक्स, प्रभात, विजय अशा पुण्यातील चित्रपटगृहाच्या मालकांना हा चित्रपट प्रदर्शित करू नये यासंबंधी महासंघाने निवेदन दिले आहे. त्याला चित्रपटगृहाच्या मालकांनी प्रतिसाद दिला असून, सिटीप्राईडच्या मालकांनी दूरध्वनी करून या चित्रपटाचे आॅनलाईन बुकिंग रद्द केले असल्याचा दावा महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. दशक्रिया चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी मुंबईला चित्रपटाचा प्रिमिअर पाहाण्यासाठी दूरध्वनीद्वारे निमंत्रण दिले मात्र आमचे मुख्य कार्यालय पुणे आहे तुम्ही पुण्यात येऊन चित्रपट दाखवावा. आम्ही येणार नाही असे त्यांना सांगण्यात आल्याचे दवे म्हणाले. मात्र महासंघाच्या या आडमुठेपणाच्या भूमिकेवरच दशक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील यांनी टीका केली आहे. आमची उद्या (शुक्रवारी) चित्रपट प्रदर्शन करण्याची धावपळ आहे. तरीही एक पाऊल मागे घेत चित्रपटाच्या प्रिमिअरला येण्यासाठी महासंघाच्या पदाधिकार्यांना निमंत्रण दिले मात्र त्यांनी पुण्यात शो आयोजित करण्यास सांगितले जे तूर्तास शक्य नाही. कोणत्याही कलाकारासाठी कलाकृती महत्त्वाची आहे. चित्रपट बघावा आणि मग चर्चा घडावी. या चित्रपटाला सेन्सॉरची परवानगी मिळाली आहे. या चित्रपटावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देणे म्हणजे राष्ट्रीय पुरस्काराचा अवमान ठरेल. महासंघाने बाबा भांड यांनी लिहिलेली ही कादंबरी देखील वाचलेली नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. कितीही विरोध असला तरी आम्ही चित्रपट प्रदर्शित करणारच असा विश्वास संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
चित्रपटाला विरोध करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असे व्हायला लागले तर ही धोक्याची घंटा आहे. कोणतीही कलाकृती जिवंत राहिली पाहिजे.
- संदीप पाटील, दिग्दर्शक, दशक्रिया