वाद दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक मंत्र्याच्या घरात बासरी वाजायला हवी : पं. हरीप्रसाद चौरासिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:57 PM2019-12-11T15:57:11+5:302019-12-11T16:03:57+5:30
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवतील 'अंतरंग' या संवादात्मक कार्यक्रमात पं. हरीप्रसाद चौरासिया यांनी बासरीचे महत्त्व विषद केले.
पुणे : आराेग्य चांगले ठेवण्यासाठी याेगाप्रमाणे बासरी या वाद्याची देखील मदत हाेते. बासरी वादनाने आजूबाजुचे वातावरणही प्रसन्न राहते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या घरात बासरी वाजायलाच हवी, पण खास करून प्रत्येक राजकारण्याच्या आणि मंत्र्याच्या घरात वाजायला हवी. म्हणजे भांडणतंटे दूर राहतील आणि ‘हार्मनी’ निर्माण होईल.’’, अशी मिश्किल टिप्पणी ज्येष्ठ बासरीवादक पं. हरीप्रसाद चौरासिया यांनी केली.
'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 'षड्ज' या शास्त्रीय संगीतावरील लघुपट महोत्सवास, तसेच 'अंतरंग' या संवादात्मक कार्यक्रमास बुधवारी सुरूवात झाली. सवाई गंधर्व स्मारक येथे चार दिवस चालणा-या या खुल्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रख्यात गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत घेतली.
‘‘माझ्या वादनाची श्रोत्यांकडून तारीफ होत असली तरी मी स्वतःला यशस्वी मानत नाही. सतत प्रयत्न करत राहणे आणि शिकत राहणे मला महत्त्वाचे वाटते.’’, अशा विनम्र भावना चौरासिया यांनी व्यक्त केल्या आणि प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. भारतीय शास्त्रीय संगीताला मिळणा-या प्रतिसादाबद्दल बोलताना चौरासिया म्हणाले, की सर्वांना हे संगीत निश्चितपणे आवडू शकते. मात्र कोणत्या श्रोतृगटासमोर काय गावे अथवा वाजवावे याचा अभ्यास कलाकाराने करणे आवश्यक आहे. तरच वेगवेगळ्या प्रकारच्या रसिकांपर्यंत हे संगीत पोहोचवता येईल.
बासरी हे महिलांनी वाजविण्याचे वाद्य नाही, असा एक मतप्रवाह आहे. याबद्दल चौरासिया म्हणाले, ‘‘माझ्या अनेक महिला शिष्या असून त्या उत्तम बासरी वाजवतात. हे वाद्य शिकण्यात कोणताही लिंगभेद नाही.’’ ‘‘माझे अनेक परदेशी शिष्यही असून त्यांच्यापैकी काहींनी सॅक्सोफोन किंवा ट्रंपेट वाजवणे सोडून बासरी हाती घेतली आहे. ते आपल्याप्रमाणेच राहण्याचा आणि विनम्रतेने शिकण्याचा प्रयत्न करतात हे पाहून चांगले वाटते. माझ्या सर्व शिष्यांना मी मित्र किंवा माझ्या परिवाराचे सदस्यच समजतो.’’, असेही चौरासिया यांनी सांगितले.