पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापराल तर बांधकाम बंद ठेवावे लागेल; पुणे महापालिका आयुक्ताचा इशारा
By राजू हिंगे | Published: April 3, 2024 09:45 AM2024-04-03T09:45:58+5:302024-04-03T09:47:40+5:30
गेल्या काही दिवसात मैलापाणी शुध्दीकरण केद्रांतुन बांधकामासाठी ८० टॅंकर गेले असून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात गेल्यावर्षी पेक्षा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे बांधकामासाठी मैलापाणी शुध्दीकरण केद्रांचे पाणी वापरण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसात मैलापाणी शुध्दीकरण केद्रांतुन बांधकामासाठी केवळ ८० टॅंकर गेले आहेत. त्यामुळे बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे यापुढे बांधकामसाठी मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांतील पाण्याऐवजी पिण्याचे पाणी वापरले तर बांधकाम बंद ठेवावी लागतील असा थेट इशारा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील पाणी पुरवठयाबाबत आढावा बैठक आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली. मैलापाणी शुध्दीकरण केद्रांतील पाण्याला बांधकाम व्यवसायिकांनी नापसंती दर्शविली असून केवळ ८० टॅंकरचीच मागणी होत आहे. त्यामुळे बांधकामांसाठी पाणी पुरवठा नेमका होतो तरी कोठून हे शोधून काढण्यासाठी महापालिकेकडुन तपासणी केली जाणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागालाही उघानामध्ये मैलापाणी शुध्दीकरण केद्रांमधीलच पाणी वापरण्याचे बंधन घालण्यात आले. तसेच विविध कामांसाठी देखील पिण्याचे पाणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोची कामे सुर असतील तर त्यासाठी देखील पिण्याचे पाणी दिले जाणार नाही . कायद्याच्या तरतूदीनुसार आवाहन करुन देखील पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांवर महापालिकेची करडी नजर राहणार आहे.
३४ गावांसाठी मास्टर प्लॉन तयार
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये जलवाहिन्यांचे मोठे जाळे नसल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे. तसेच ज्या भागात जल वाहिन्या आहेत परंतु पाणी पुरवठा होत करण्यास तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुस, म्हाळुंगे, पिसोळी, होळकरवाडी, फुरसुंगी, उरुळी, मांजरी बु. या गावांमध्ये पाण्याच्या अधित तक्रारी आहेत. या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी या गावांत १ हजार ९८ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता, यावर्षी हाच आकडा साडे बाराशेपर्यंत पोचला आहे. या समाविष्ट गावांत काही ठिकाणी दोन, तीन, चार दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. आवश्यक तेथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहे. तसेच सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ३४ गावांसाठी मास्टर प्लॉन तयार केला जाणार असल्याचे आयु्क्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
मुळशी धरणातुन ५ टीएमसी पाणी उपलब्ध होईल
पुणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता मुळशी धरणातुन ५ टीएमसी पाणी घ्यावे लागणार आहे. वेळप्रसंगी धरणाची उंची वाढवावी लागू शकते. शहरात पाणी कपात केली जाणार नाही. मात्र नागरिकांनी पाणी साठ्याचा विचार करुन पाणी जपूनच वापरण्याचे आवाहन आयुक्त भोसले यांनी केले आहे.