पुन्हा वीज दरवाढ लादल्यास उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडणार; महावितरणला आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 03:47 PM2023-02-06T15:47:48+5:302023-02-06T16:06:31+5:30

प्रस्तावित वीज दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील उद्योजक आंदोलन करतील ...

If electricity price hike is imposed again, the financial calculations of industries will collapse; Warning of movement to Mahavitran | पुन्हा वीज दरवाढ लादल्यास उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडणार; महावितरणला आंदोलनाचा इशारा

पुन्हा वीज दरवाढ लादल्यास उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडणार; महावितरणला आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

बारामती (पुणे) : महावितरणने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे जवळपास ३७ % इतकी प्रचंड वीज दरवाढ  करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मुळातच महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत वीजदर अधिक आहे. पुन्हा दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील उद्योजक आंदोलन करतील असा इशारा बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिला आहे.

याबाबत उद्योजकांनी वीज दरवाढीविरोधात महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष शरद सुर्यवंशी, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख, संभाजी माने, उद्योजक विजय झांबरे, संदीप जगताप, अनिल काळे, शार्दुल सोनार, सुनील वैद्य, उज्वल शहा, सुनील पवार, हेमंत हेंद्रे, नितीन जामदार, सुजय पवार, विजय जाधव, सुशिल घाडगे, विनोद मोरे, रघुपती, रत्नाप्पा जैन आदी उद्योजक तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते उपस्थित होते.

जामदार पुढे म्हणाले, राज्या राज्यातील उद्योगांमधील तीव्र स्पर्धा असताना महाराष्ट्रातील वीजदर कळीचा मुद्दा ठरत आहे. अशातच पुन्हा वीज दरवाढ केली तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायिक स्पधेर्तून बाहेर फेकले जातील याची चिंता वाटत आहे. आत्ताच बारामती सह राज्यातील अनेक मोठे प्रकल्प अवाजवी वीज दरामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कित्येक लहान मोठे उद्योग परराज्यात स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. औद्योगिक क्षेत्रात आजही आपले महाराष्ट्र राज्य देशात अव्यल स्थानावर असून राज्य शासनाने हे स्थान टिकवून ठेवण्याचे धोरण ठेवले पाहीजे .परंतु दुदैर्वाने या उलट होताना दिसत आहे.महावितरणने वीज गळती, वीज चोरी बरोबरच भ्रष्टाचारास आळा घालत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रभावी व्यवस्थापन करून काटकसरीचे धोरण राबवणे अत्यावश्यक आहे. वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे, खाजगी वीज प्रकल्पातून कमीत कमी दराने वीज खरेदी करणे तसेच सौर ऊर्जा व पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या बाबी अंमलात आणल्या तर मोठी आर्थिक बचत होऊ शकते व विज दरवाढ करण्याची वेळ येणार नाही, असे आमचे मत आहे.

वीज दरवाढीविरोधात उद्योजकांच्या भावना तीव्र आहेत. याबाबतचे निवेदन राज्य सरकार व महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सत्वर पाठवण्यात येईल असे आश्वासन मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.

Web Title: If electricity price hike is imposed again, the financial calculations of industries will collapse; Warning of movement to Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.