पुरावा दिल्यास अजित पवारांविरोधात पोलिसांत तक्रार करीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:31+5:302021-06-29T04:08:31+5:30
पुणे : जर कोणता बांधकाम व्यावसायिक अथवा अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून आंबिल ओढ्याची कारवाई केली आणि मी ...
पुणे : जर कोणता बांधकाम व्यावसायिक अथवा अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून आंबिल ओढ्याची कारवाई केली आणि मी अजित पवारांचा माणूस आहे असे सांगत असेल, तर मला तसे पुरावे द्या. मी स्वतः पोलिसांत त्याविषयी तक्रार करीन अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
आंबिल ओढा येथील झोपडपट्टीतील घरांवर झालेल्या कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि स्थानिक रहिवाशांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलकांची सुळे यांनी भेट घेतली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्री राजीनामा द्या, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर सुळे यांनी स्वच्छ संस्था, कामगार पुतळा वसाहत मेट्रोबाधित रहिवासी आणि आंबिल ओढा याविषयांवर पालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी सुळे यांनी आवाहन करूनही आंबिल ओढा येथील आंदोलक त्यांच्यासोबत आयुक्तांकडे गेले नाहीत. सुळे यांनी मेट्रोबाधित नागरिकांसह आयुक्तांची भेट घेतली.
---
प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा आवश्यक
आंबिल ओढ्यासंदर्भात आता कारवाई करणार नसल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे. आंदोलकांनी चर्चा करण्यास समोर यावे. मेट्रोबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, मेट्रोचे अधिकारी आणि बाधितांचे पाच प्रतिनिधी अशी एकत्र बैठक घेतली जाणार आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार