सरकारवर टीका केली तर होईल अटक...
By admin | Published: May 1, 2017 03:20 AM2017-05-01T03:20:42+5:302017-05-01T03:20:42+5:30
सध्याची परिस्थिती आणि सध्याच्या राजकारणावर भारत सरकार, पंतप्रधान, खासदार, मुख्यमंत्री इत्यादींवर कोणतीही पोस्ट
पुणे : सध्याची परिस्थिती आणि सध्याच्या राजकारणावर भारत सरकार, पंतप्रधान, खासदार, मुख्यमंत्री
इत्यादींवर कोणतीही पोस्ट अथवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नका़ पोलिसांनी नोटिफिकेशन काढले असून, त्यानुसार हे सायबर क्राइम होईल आणि त्यावर तातडीने कारवाई केली जाईल़ कोणत्याही वॉरंटशिवाय अटक केली जाईल़ तेव्हा राजकारणावर आणि धर्मावरील चर्चेचा कोणताही मेसेज हा गुन्हा होईल़ तेव्हा सर्वांनी हे गंभीरपणे घ्यावे़ अशा प्रकारचे तद्दन बनावट मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर धुमाकूळ घालत आहेत़ अशा प्रकारे लोकांना भीती दाखवण्याची नवी पद्धत आणि आपल्याविरुद्ध कोणताही तक्रारीचा सूर उमटू नये, यासाठी हे प्रकार सुरू झाले आहेत़ याबाबत पुणे शहर
पोलीस आणि सायबर क्राइममधील तज्ज्ञ वकिलांनी असे कोणतेही नोटिफिकेशन पोलिसांनी काढले नसल्याचे सांगितले आहे़
सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही निर्णयावर उलटसुलट चर्चा होते़ विरोधक त्यावर टीका करतात़ पण, अशा सर्व प्रकारच्या निर्णयावर आपल्याला काय वाटते, हे मांडण्यासाठी सध्या सर्व जण फेसबुक, व्हॉट्सअॅपचा आधार घेतात़
विविध ग्रुपवर होणाऱ्या
चर्चांमध्ये राजकीय गोष्टीबाबतच सर्वाधिक चर्चा असते़ त्यातून बऱ्याचदा सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका होताना दिसते़ अशा टीकेमुळे समाजातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार होऊ शकते, हे लक्षात घेऊन बहुदा अशाप्रकारचे मेसेज पसरविले जात असल्याचे बोलले जात आहे़ याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले, की जाणूनबुजून अशाप्रकारचे =मेसेज पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे़ (प्रतिनिधी)
टीका करण्याचा सर्वांना अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा एका निवाडा आहे़ त्यानुसार सरकारच्या कोणत्याही निर्णयावर मत व्यक्त करण्याचा नागरिकांना अधिकार आहे़ तसेच कोणाच्याही मताविरोधात आपले मत व्यक्त करता येते़ केवळ त्यात वैयक्तिक बदनामी होईल असे काही नसावे़ टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे़ केवळ निर्णयावर टीका केली म्हणून कोणावरही कारवाई होऊ शकत नाही़
- अॅड़ गौरव जाचक, सायबर क्राइममधील तज्ज्ञ
पोलिसांचे अशा प्रकारचे कोणतेही नोटिफिकेशन नाही़ कोणताही शासकीय आदेश नाही़ व्हॉट्सअॅपचा हा गैरवापर आहे़ त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये़
- दीपक साकुरे, पोलीस उपायुक्त, सायबर सेल, पुणे
हे म्हणजे सरकारच्या विरोधात कोणीच काही बोलायचे नाही़ जनतेसाठी सरकार चालवताय ना़, मग टीकाही ऐकून घ्यायलाच हवी़ अशा प्रकारे आवाज दाबणे किंवा मुस्कटदाबी करणे असे होईल व देश हळूहळू हुकूमशाहीकडे जातोय की काय अशी भीती वाटते़
- अॅड़ मिलिंद पवार