पुण्यात 'हे' घडलं तर मोदी अन् शाहांना आनंद होईल; गिरीश बापटांचे कार्यकर्त्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:10 PM2021-12-20T12:10:39+5:302021-12-20T12:10:57+5:30
पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची सहा ते सात लाखाची वोट बँक आहे. ती वोट बँक जेव्हा दहा लाखांवर जाईल तेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आनंद वाटेल.
पुणे : पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार विचारपूर्वक योजना आखल्या आहेत. गोरगरीब, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक समाजातील एक घटक त्यांनी सोडला नाही. त्यांच्यापर्यंत आता आपण पोचण्याची गरज आहे. पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची सहा ते सात लाखाची वोट बँक आहे. ती वोट बँक जेव्हा दहा लाखांवर जाईल तेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आनंद वाटेल.. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले. पुण्यात रविवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते.
बापट म्हणाले, आगामी काळात भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दहा नवीन लाभार्थी मिळवायचे आहेत आणि वोट बँक वाढवायची आहे. एक लक्षात ठेवा वोट बँक झेंडे लावून, बॅनर लावून, पेपरला फोटो देऊन वाढणार नाही. तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा लाभार्थी व्यक्तीच्या घरी जाईल तेव्हाच ही वोट बँक वाढेल. नागरिकांना सांगण्यासाठी भाजपच्या खूप साऱ्या योजना आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दहा नवीन लाभार्थी मिळवले तरी या वोट बँकेत आणखी भर पडेल. मग शंभरच काय आणखी जास्त उमेदवार निवडून येतील. आपण महापालिका तर ताब्यात घेऊच, विधानसभाही ताब्यात घेऊन.. लोकसभा तर आधीच ताब्यात घेतली आहे. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची घोडदौड
पुण्यातही सुरूच राहील असा विश्वास बापट यांनी या वेळी व्यक्त केला.