झपाटलेपणाला शिस्तीचे कोंदण लाभल्यास त्याचे ध्यासात रूपांतर : डाॅ. मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:53+5:302021-09-09T04:15:53+5:30

पुणे : छंद आणि झपाटलेपण यात फरक आहे. छंद हा येता-जाता फावल्या वेळेत करावयाचा उद्योग आहे. तर सर्वस्व विसरून ...

If haste leads to disciplinary action, it turns into meditation: Dr. Mohan Agashe | झपाटलेपणाला शिस्तीचे कोंदण लाभल्यास त्याचे ध्यासात रूपांतर : डाॅ. मोहन आगाशे

झपाटलेपणाला शिस्तीचे कोंदण लाभल्यास त्याचे ध्यासात रूपांतर : डाॅ. मोहन आगाशे

Next

पुणे : छंद आणि झपाटलेपण यात फरक आहे. छंद हा येता-जाता फावल्या वेळेत करावयाचा उद्योग आहे. तर सर्वस्व विसरून ज्या गोष्टीकरिता व्यक्ती झपाटलेली असते. त्याचाच केवळ ध्यास धरते. या वेडेपणाला, झपाटलेपणाला शिस्तीचे कोंदण लाभल्यास त्याचे ध्यासात रूपांतर होते, असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित आणि दूरदर्शन वृत्तनिवेदिका आणि व्याख्यात्या दीपाली केळकर लिखित ‘खेळ मांडीयेला’ गोष्ट भातुकलीच्या राजाची, मान्यवरांच्या भातुकलीची आणि भांड्यांची या पुस्तकाचे प्रकाशन आगाशे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लेखक, कवी, गायक डाॅ. आशुतोष जावडेकर, भातुकलीचे संग्राहक विलास करंदीकर व्यासपीठावर उपस्थित होते.

डाॅ. आगाशे म्हणाले, भातुकलीत अवघे विश्वरूप सामावलेले असून या खेळात समग्र जीवनदर्शन घडते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता प्रत्येक मुलात मुलीचे अंश असतात आणि प्रत्येक मुलीमध्ये मुलाचे अंश असतात. त्यामुळे भातुलकली हा केवळ मुलींच्याच खेळण्याचा खेळ आहे, असे विधान करणे धारिष्ट्याचे होईल. मानसशास्त्रात समोरच्याचे मन जाणून घेण्याकरिता ज्या फुटपट्ट्या सांगितलेल्या आहेत. त्यात भातुकली खेळाचादेखील समावेश करावा, असे म्हणावसे वाटते. भातुकली खेळणाऱ्या मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्यासाठी या फुटपट्टीचा नक्कीच उपयोग होईल.

डाॅ. आशुतोष जावडेकर म्हणाले, भातुकली केवळ खेळ नसून त्याला सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक असे अनेक आयाम आहेत. या सर्व आयामात भातुकली हा खेळ मूल्य संस्कार करणारा खेळ आहे. या खेळाद्वारे गट संघटन वाढीस लागते. जो हा खेळ खेळत असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक त्यात दिसून येते. तसेच मुलांना या खेळाद्वारे निर्मितीचाही आनंद मिळतो. भातुकली हा स्मरणरंजनाचे माध्यम असला तरी त्यात काळानुरूप बदल होणे अपेक्षित आहे. आजच्या मुला-मुलींचे विश्व फार वेगळे आहे. त्या विश्वाच्या जवळपास पोहोचणारा भातुकली खेळ विकसित झाला पाहिजे. बदलत्या काळातील मूल्ये त्यात आली पाहिजे.

भातुकलीचे संग्राहक विलास करंदीकर यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच दीपाली केळकर यांनी पुस्तक निर्मितीमागील भूमिका विषद केली.

फोटो - मोहन आगाशे

फोटो ओळी - भातुकलीच्या राजाची, मान्यवरांच्या भातुकलीची आणि भांड्यांची या पुस्तकाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे. या वेळी (डावीकडून) विलास करंदीकर, डाॅ. आगाशे, डाॅ. आशुतोष जावडेकर आणि दीपाली केळकर.

Web Title: If haste leads to disciplinary action, it turns into meditation: Dr. Mohan Agashe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.