रंगभूमीवर लवकर अवतरलो असतो तर...‘नटसम्राटा’ची खंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:33+5:302020-12-17T04:37:33+5:30

पुणे : “श्रीराम आयुष्यात खूप समाधानी होते. शेवटच्या दिवसात फक्त मला तुमच्यासारखं बरं कधी होता येईल असं ते म्हणत. ...

If he had appeared on the stage early ... the grief of 'Natsamrata'? | रंगभूमीवर लवकर अवतरलो असतो तर...‘नटसम्राटा’ची खंत?

रंगभूमीवर लवकर अवतरलो असतो तर...‘नटसम्राटा’ची खंत?

Next

पुणे : “श्रीराम आयुष्यात खूप समाधानी होते. शेवटच्या दिवसात फक्त मला तुमच्यासारखं बरं कधी होता येईल असं ते म्हणत. पण त्यांची कोणतीच इच्छा अपूर्ण राहिली नव्हती. त्यांना जसं आयुष्य जगायचं होतं तसंच ते जगले. कदाचित नाटक किंवा अभिनयाकडे लवकर वळलो असतो तर, असं कधीतरी त्यांना वाटलं असेल. कारण ते अभिनयाकडे पुन्हा वळले तेव्हा ते ४३ वर्षांचे होते. लवकर आलो असतो तर? कदाचित वेगळी नाटके करायला मिळाली असती ही भावना त्यांच्या मनात कधीतरी आलेली असू शकते,” ही आठवण सांगत होत्या डॉ. श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम.

गुरुवारी (१७ डिसेेंबर) डॉ. श्रीराम लागू यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. या निमित्ताने त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “वेताळ टेकडीवर डॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावण्यात आलेलं रोपटं म्हणजे त्यांची एक आठवण आहे. हा ‘स्मृतिवृक्ष’ बहरल्यानंतर त्याच्याभोवती एक चवथरा केल्यास लोक तिथं बसून नाटकाविषयी गप्पागोष्टी शकतील. लोकांसाठी हे प्रेरणादायी स्थळ व्हावं.” अशी अपेक्षा दीपा श्रीराम यांनी व्यक्त केली.

रंगभुमीवरचे अनभिषिक्त ‘नटसम्राट’ डॉ. लागू वास्तववादी जीवनात कायमच सामान्य माणसाच्याच भूमिकेत वावरले. ज्या वेताळ टेकडीवर ते फिरायला जात तिथे एका बाकावर शांतपणे बसलेली डॉ. लागू यांची मुद्रा पुणेकरांच्या सवयीची झाली होती. त्यांच्या आठवणी जागवणारा तो ‘बाक’ यापुढंही सर्वांच्या स्मरणात राहावा यासाठी डॉ. लागू यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी स्मृतिवृक्षाचे रोपण केले. आज वर्षभरानंतर ते रोपटे बहरून आले आहे.

डॉ. लागूंच्या स्मृतीदिनी कोथरुड येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या म्हणजेच वेताळ टेकडीवर लागू कुटुंबीयांसह काही मोजकी मंडळी सायंकाळी पाच वाजता एकत्रित जमणार आहेत. परंतु आम्ही कोणत्याही स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले नसल्याचे दीपा श्रीराम म्हणाल्या.

चौकट

नटसम्राट, हिमालयाची सावली यासारखी अनेक नाटके डॉ. श्रीराम लागू यांनी अजरामर केली. ही नाटके नव्या पिढीसाठी पुनश्च: रंगमंचावर यावीत अशी रसिकांची इच्छा आहे याबद्दल दीपा श्रीराम यांनी आनंद व्यक्त केला. डॉ श्रीराम हे हयातीत असताना ही नाटके रंगमंचावर आणण्याबाबत त्यांचा कधीच आक्षेप नव्हता. कुणाला जर त्यांची नाटके करावीशी वाटली तर ही खूप चांगली गोष्ट आहे. ही छान कल्पना असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: If he had appeared on the stage early ... the grief of 'Natsamrata'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.