घर स्वच्छ ठेवतो, तर शहर अन् देश का नाही ? डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:05 PM2020-03-02T13:05:11+5:302020-03-02T13:05:36+5:30
संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आपण प्रत्येकजण भाग आहोत.
पुणे : साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आपण प्रत्येकजण भाग आहोत. या भावनेतून प्रत्येकाने स्वच्छता राखावी. ज्याप्रमाणे आपण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवतो. त्याचप्रमाणे शहर आणि देश स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेबधर्माधिकारी यांनी केले.
सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छता अभियाना’ची घोषणा केली. नुकतीच राज्यपालांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ‘स्वच्छ भारत अभियाना’चे अग्रदूत (अॅम्बेसिडर) म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे. शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले होते.
डॉ. धर्माधिकारी यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, की प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायला हवा. जमा होणारा कचरा निर्धारित केलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे.
स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवता येणे शक्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेबरोबरच स्वयंशिस्तीतून आपण देशाला जगातील सर्वांत स्वच्छ देश म्हणून नावारुपाला आणू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवताना शहर व देशदेखील स्वच्छ ठेवण्याची भावना मनात रुजविणे गरजेचे आहे.
शहरातील शासकीय कार्यालये, रुग्णालये, एसटी डेपो, पोलीस मुख्यालय व वसाहत या परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याला नागरिक व स्वयंसेवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्वच्छता मोहिमेतून २१० टन कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
शासकीय तिजोरीवर नाही ताण
या उपक्रमामध्ये शहराचे घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विरोधी पक्ष नेत्या वैशाली धुमाळ, आदित्य माळवे, भाजप पक्षाचे शिवाजीनगर विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र साळेगावकर, संदीप काळे, मयूर मुंडे, गौरव गोटे उपस्थित होते. शासकीय तिजोरीवर कोणताही अतिरिक्त ताण पडू न देता संपूर्ण परिसरातील लोकांच्या सहकार्याने आणि समन्वयातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याकरिता हातमोजे, मास्क, कचºयाची विल्हेवाट लावणारी उपकरणे या वस्तू प्रतिष्ठानच्या वतीने पुरविण्यात आल्या.