मी नसेल तर तू नक्कीच प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडशील; भाऊ मला नेहमी बोलायचे - रवींद्र धंगेकर
By निलेश राऊत | Published: March 29, 2023 04:55 PM2023-03-29T16:55:31+5:302023-03-29T17:00:14+5:30
पक्ष चुकला तरी स्वत:च्या पक्षाला सुनावण्यात त्यांनी मागे पुढे पाहिले नाही
पुणे : खाजगीत व पक्षाच्या लोकांना नेहमी ते सांगत की, रवी धंगेकर हा पुणे शहरामध्ये चांगले नेतृत्व करेल. कारण माझ्याविरोधात निवडणूक लढविताना मी त्याला पाहिले आहे. आणि त्याची लढण्याची पध्दत व सर्वसामान्य नागरिकांची त्याच्याबरोबर जोडली जात असलेली नाळ पाहता, मी नसेल तर तू नक्कीच कुठल्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडशील असे तुझे काम असल्याचे मला भाऊ नेहमी बोलायचे अशी प्रतिक्रिया देत कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी बापट यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी नेहमी सर्व समावशेक राजकारण केले.
काम करावे तर रवी धंगेकर सारखे करावे असे आपल्या पक्षाच्या सांगणारे गिरीश भाऊ. आमदार झाल्यावर मी त्यांना भेटलो होतो तेव्हा मला नियोजनाप्रमाणे काम केल्यास यशस्वी होशील असा सल्ला दिला. नगरसेवक, आमदार आणि खासदार असा मोठा प्रवास गिरीश बापट यांचा पुण्याच्या राजकीय जीवनात झाला. या सर्व पदावर काम करीत असताना त्यांनी नेहमी सर्व समावशेक राजकारण केले. जिथे चूक तिथे चूकच आणि जिथे खरे तिथे खरेच हे त्यांच्या राजकारणातील एक वैशिष्ट्य होते. पक्ष चुकाला तरी स्वत:च्या पक्षाला सुनावण्यात त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. आजच्या राजकारणाचा जो स्तर खालावत चालला आहे, तो स्तर खालवत असताना गिरीश बापट सारख्या नेत्यांची पुण्याला गरज होती. परंतु त्यांचे आज निधन झाल्याने पुणे शहराची राजकीय पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांनी केलेल्या कामातील थोडासा जरी भाग माझ्या सारख्या कार्यकर्त्यांने केला तरी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजी मिळेल. माझ्या काँग्रेस पक्षाच्या, परिवाराच्या व कसबा मतदार संघाच्यावतीने मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.- रविंद्र धंगेकर, आमदार कसबा विधानसभा मतदार संघ.
पक्षासोबतची एकनिष्ठता शेवटपर्यंत जपली-
मविआचे सरकार पडल्यानंतर भाजप पक्षासाठी कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावण्यात आली. कसबा पेठ निवडणुकीवेळी खासदार गिरीश बापट स्वतः भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. गिरीश बापट हे व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले होते. प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आणि पक्षाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली होती. यावेळी ते व्हीलचेअरवर आले होते. नाकात ऑक्सिजनची नळी, व्हीलचेअरला ऑक्सिजन सिलेंडर लावून ते केसरी वाडा येथे आले होते.