जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:33 IST2025-01-31T16:32:28+5:302025-01-31T16:33:35+5:30
शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती

जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण
पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. अशी आठवण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २ रा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे.
मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे, तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला आज मंत्रिपद का मिळाले नाही ? याची खंत वाटते. मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही, परंतु मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी होतो, अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.
मी माझा वापर कोणालाही करू देत नाही
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी भावना निर्माण झाली त्याचा निश्चितच फटका मला बसला आणि माझे मताधिक्य कमी झाले. परंतु तरीही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला असे अनेकांना वाटते.परंतु छगन भुजबळ चा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी माझा वापर कोणालाही करू देत नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.