मी दोन पावलं चालले, तर ते माझ्यासाठी आठ पावले : उमा कुलकर्णी यांनी पती विरूपाक्ष यांच्यांशी ५१ वर्षांचा ऋणानुबंधच-मान्यवरांनीही जागवल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:10+5:302021-04-18T04:11:10+5:30

एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे बाई असते असं म्हटले जाते. मात्र उमा कुलकर्णी यांच्या मागे एखाद्या सावलीसारखे विरूपाक्ष हे खंबीरपणे ...

If I walk two steps, it is eight steps for me: Uma Kulkarni's 51-year bond with her husband Virupaksha | मी दोन पावलं चालले, तर ते माझ्यासाठी आठ पावले : उमा कुलकर्णी यांनी पती विरूपाक्ष यांच्यांशी ५१ वर्षांचा ऋणानुबंधच-मान्यवरांनीही जागवल्या आठवणी

मी दोन पावलं चालले, तर ते माझ्यासाठी आठ पावले : उमा कुलकर्णी यांनी पती विरूपाक्ष यांच्यांशी ५१ वर्षांचा ऋणानुबंधच-मान्यवरांनीही जागवल्या आठवणी

Next

एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे बाई असते असं म्हटले जाते. मात्र उमा कुलकर्णी यांच्या मागे एखाद्या सावलीसारखे विरूपाक्ष हे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्यासमवेत चालत असतानाच उमाताईंना अनुवादाची वाट गवसली. विरूपाक्ष हे संरक्षण खात्याच्या हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून काम करीत होते. दोघांनाही वाचनाची आवड. दिवसभर भरपूर वाचायचं आणि संध्याकाळी फिरायला जाताना आज दिवसभरात काय वाचलं त्याविषयी चर्चा करायची असा त्यांचा दिनक्रम होता. 1978 मध्ये प्रसिद्ध कन्नड साहित्यिक शिवराम कारंथ यांच्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर त्या पुस्तकाबद्दल उमाताईंच्या मनात कुतुहल निर्माण झालं. पण उमाताईंना कन्नड बोलता येत असलं, तरी वाचता येत नव्हतं. मग त्यांना वाचून दाखविण्याची जबाबदारी विरूपाक्ष यांनी उचलली आणि उमाताई त्याचे मराठी भाषांतर करू लागल्या. नंतरच्या काळात ती जागा टेपरेकॉर्डरने घेतली. विरूपाक्ष कामावर जाण्यापूर्वी शक्य तितका कादंबरीचा भाग टेप करून जायचे आणि उमाताई त्यावरून मराठी अनुवाद करायच्या. या माध्यमातून विरूपाक्ष यांनी उमाताईंना कायमच सर्जनशील साथ केली. यंदाच्या मार्च महिन्यामध्ये त्यांच्या संसाराला ५१ वर्षे पूर्ण झाली आणि एकच महिन्यात इतकी वर्षे साथ देणारा सहप्रवासी अचानक निघून गेला. ‘संसारातील सहप्रवासी एकमेकांचा हात धरून वाटचाल करतात, पण असं नसतं तर ज्याला जास्त पावलं चालणं शक्य असेल तसं तो चालतो. पण ती पावले एकमेकांकडे टाकावी लागतात तेव्हाच आयुष्याची वाटचाल सुरू होते... अशी भावना उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

------------------------------------------------

विरूपाक्ष हे माझे चांगले मित्र व उत्तम सल्लागार होते. माझ्या आयुष्यातील अनेक प्रश्न, अडीअडचणी त्यांच्याकडे घेऊन जायचो आणि ते मला छान पद्धतीने समजावून सांगायचे. संरक्षण खात्याच्या हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये काम करताना कामगारांचे प्रश्न कसे सोडवले याचा अनुभव ते आम्हाला सांगायचे. आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतील ते सांगण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कधी कुणाची निंदा किंवा कुणावर टीका केली नाही. ते अत्यंत सज्जन माणूस होते. घरात चहा व नाश्तादेखील तेचं बनवित असतं. त्यांच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे.

- अनिल अवचट, ज्येष्ठ लेखक

-----------------------------

आम्ही मूळ बेळगावचे. महाविद्यालयीन पदवी संपादन केल्यानंतर पुण्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे राहिलो होतो. माझ्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड प्रभाव पडला. काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की ज्यांच्यामुळे विचारांना दिशा मिळते, त्यातले ते होते. त्यांच्यामुळे मनात सकारात्मक विचारांची पेरणी झाली. ते एक उत्तम गुरू आणि मित्र होते. आळंदी साहित्य संमेलनावेळी प्रसिद्ध कन्नड साहित्यिक शिवराम कारंथ हे पुण्यात आले असता ते त्यांच्याच घरी उतरले होते. कन्नड साहित्यिक भैरप्पा, पु. ल. देशपांडे, अनिल अवचट, दिलीप चित्रे यांसारखी साहित्यातील अनेक दिग्गज मंडळी त्यांच्याकडे येत असतं. त्यांच्यामध्ये वैचारिक आदानप्रदान होत असताना ते अमृत साठवून घेण्याची संधी देखील अनेकदा मिळाली. त्यांना संगीताची देखील आवड होती. सुरेल गळा असूनही कर्नाटकातील कर्मठ लोकांमुळे त्यांना संगीत शिकता आले नाही. जगण्याविषयीची सकारात्मक दृष्टी त्यांच्यात अनुभवायला मिळायची. कमल देसाई त्यांच्याकडे यायच्या. एकदा त्या म्हणाल्या, मी जगून काय करू? माझ्यामागे कुणी नाही. त्या त्यांना ‘दादा’ संबोधित असतं. तेव्हा जगणं किती सुंदर आहे यावर त्यांनी देसाई यांना तीन तास लेक्चर दिले होते. त्याचा साक्षीदार मी ठरलो होतो.

- राजेंद्र कुलकर्णी, मेहुणे

---------------------

विरूपाक्ष कुलकर्णी यांचे मराठी-कन्नड साहित्यातील दुवा होण्याचे जे काम होते. ते मला अधिक महत्त्वाचे वाटते. ते व्यवसायाने इंजिनिअर होते. पण त्यांचे दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. मराठी साहित्य, निवडक पु.लं. ‘आहे मनोहर तरी’सारख्या कलाकृती कन्नड भाषेत नेणं हे त्यांचे योगदान खूप मोठं आहे. उमाताईंच्या अनुवादाच्या कामात मदत करणे हे तर अप्रुपच आहे. पुढील काळात कानडी-मराठी अनुवाद सेंटर म्हणूनच त्यांचे घर झाले. पु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर सुनीताबाईंचे चरित्र लिहायला घेतले. तेव्हा दोन-तीनदा त्यांच्याकडे गेले होते. ‘आहे मनोहर तरी’चा कन्नड अनुवाद त्यांनी केल्यामुळे सुनीताबाईंशी त्यांचा कसा संवाद झाला होता. ते त्यांनी आपुलकीने सांगितले होते. दुस-या लेखकाच्या लेखनप्रपंचनात फारसा कुणी रस घेत नाही. पण त्यांनी नम्रपणे सर्व सांगितले. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे.

- मंगला गोडबोले, ज्येष्ठ लेखिका

--------------------------

Web Title: If I walk two steps, it is eight steps for me: Uma Kulkarni's 51-year bond with her husband Virupaksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.