दिल्लीत हाेते तर, पुण्यात का नाही? महापालिकेची वस्ती क्लिनिक योजना फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:31 PM2022-11-18T12:31:51+5:302022-11-18T12:33:43+5:30
शहरात आता एकही क्लिनिक नाही...
- राजू हिंगे
पुणे : दिल्लीच्या धर्तीवर पुणे शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेच्या वतीने वस्ती क्लिनिक योजना सुरू केली होती. महापालिका प्रशासनाने ४६ पैकी केवळ मंगळवार पेठ, येरवडा, विमाननगर यासह १६ ठिकाणी ‘वस्ती क्लिनिक’ सुरू केले होते; पण आता शहरात एकही वस्ती क्लिनिक सुरू नसल्याचे दिसून येत आहे. यावरून दिल्लीत यशस्वी ठरलेली ही योजना पुण्यात नापास झाली, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
झोपडपट्ट्यांमध्ये वस्ती क्लिनिक योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने २०१७ साली घेतला हाेता. समाजमंदिर, सभागृह, आरोग्य कोठी वस्ती पातळीवर आहेतच. तिथेच हे वस्ती क्लिनिक सुरू करावे, असा निर्णय घेतला गेला. यानुसार महापालिकेचे डॉक्टर आठवड्यातील ३ दिवस या वस्ती क्लिनिकमध्ये उपलब्ध राहत होते. नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधेही तिथे दिली जात होती.
असा हाेत हाेता फायदा
- शहरात महापालिकेची एकूण ६२ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमधील डॉक्टरच नागरिकांसाठी वस्ती क्लिनिकसाठी उपलब्ध राहणार होते. यातून नागरिकांच्या घरापर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून शहरातील नागरिकांचे आरोग्य विषयक प्रश्न साेडवण्यास महापालिका प्रशासनाला मदत होत होती. छोट्या आजारांवर तिथल्या तिथे लगेच औषधे दिली जात होती. वेगवेगळ्या आजारांच्या साथी पसरू नयेत याकरिता नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी या वस्ती क्लिनिकची मोठी मदत होत होती.
- शहरातील ससून रूग्णालय, औंध सर्वोपचार रुग्णालय येथे किरकोळ आजाराच्या रुग्णांची गर्दी होत असे. वस्ती पातळीवर क्लिनिक सुरू झाल्याने ही गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकली.
योजना कागदावरच
खासगी हॉस्पिटलकडून साध्या तपासणीसाठी २०० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. या पार्श्वभूमीवर गरीब रुग्णांसाठी वस्ती क्लिनिक योजना फायदेशीर ठरणार होती. प्रत्यक्षात दोनच ठिकाणी वस्ती क्लिनिक सुरू केले होते. आता या दोन्ही ठिकाणी हे क्लिनिक बंद आहे. त्यामुळे ही योजना कागदावरच राहिली आहे.
दिल्ली माॅडेल काय आहे?
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने ४०० माेहल्ला क्लिनिक सुरू केली होती. तेथे मोफत उपचार आणि औषधे देण्याची व्यवस्था केली होती. या क्लिनिकसाठी एक व्हॅन, एक डॉक्टर, एक नर्स, एक सेवक यांचा समावेश होता.
वस्ती क्लिनिकचं काय झालं?
- पुणे महापालिकेने २०१७ साली झोपडपट्ट्यांमध्ये वस्ती क्लिनिक योजना सुरू केली.
- या नियाेजित ४६ क्लिनिकपैकी प्रत्यक्षात १६ ठिकाणीच क्लिनिक सुरू झाले.
- काही कालावधीनंतर दाेनच ठिकाणी क्लिनिक सुरू राहिले.
- कोरोनानंतर दोन्ही ठिकाणची क्लिनिक बंद झाली आहेत.
दिल्ली पास, पुणे का नापास!
- महापालिका प्रशासनाची उदासीनता
- आरोग्य विभागाकडील अपुरा कर्मचारी वर्ग, डॉक्टर
- प्रशस्त जागांचा अभाव
- आठवड्यातून केवळ तीनच दिवस सुरू असल्याने आणि बऱ्याचदा डाॅक्टर उपस्थित राहत नसल्याने, उशिरा येत असल्याने नागरिकांचाही अल्प प्रतिसाद
येरवड्यात वस्ती क्लिनिक सुरू होते. त्याचा गोरगरीब जनतेला लाभ मिळत होता. कामगार वर्गाला कामावरून आल्यानंतर या क्लिनिकमध्ये उपचार मिळत होते. गेल्या तीन वर्षांपासून हे क्लिनिक बंद झाले आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल हाेत असून, आर्थिक भुर्दंड साेसावा लागत आहे.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक
महापालिकेने १६ ठिकाणी वस्ती क्लिनिक सुरू केले होते. कोरोनानंतर विमाननगर या एकाच ठिकाणी वस्ती क्लिनिक सुरू होते. तेथेही कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे.
- डाॅ. प्रल्हाद पाटील, वैद्यकीय अधिकारी, महापालिका