लोकशाहीतले ‘राजे’ ऐकत नसतील, तर त्यांना अडवा : उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:52+5:302021-06-16T04:15:52+5:30

पुणे : “लोकशाहीतील ‘राजे’ नीट वागत नसतील तर त्यांना ‘अडवा आणि गाडा’. सरकारला देशाची फाळणी करायची आहे का? मराठा ...

If the 'kings' of democracy do not listen, then stop them: Udayan Raje | लोकशाहीतले ‘राजे’ ऐकत नसतील, तर त्यांना अडवा : उदयनराजे

लोकशाहीतले ‘राजे’ ऐकत नसतील, तर त्यांना अडवा : उदयनराजे

Next

पुणे : “लोकशाहीतील ‘राजे’ नीट वागत नसतील तर त्यांना ‘अडवा आणि गाडा’. सरकारला देशाची फाळणी करायची आहे का? मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे,” अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

सोमवारी (दि. १४) पुण्यात औंध येथे छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उदयनराजे यांनी सांगितले, की व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केले नाही. आंदोलन वगैरे का होते? आरक्षण द्यायचे असते तर राज्यकर्त्यांनी ते मागेच दिले असते. राजकारण व्यक्तिकेंद्रित झाले आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका. मराठा समाजाचा उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नाही.

भूतकाळाचा विचार करायला पाहिजे, हे असे का झाले? असा प्रश्न छत्रपती उदयनराजे यांनी विचारला. निवडून यायचे असल्याने त्यांना सोईच्या असलेल्या समाजाचा ते फायदा करून देतात. लोकशाहीतले राजे नीट वागत नसतील, तर त्यांना अडवा आणि गाडा. माझ्यापासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा, असेही त्यांनी सांगितले.

“छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे,” अशी ग्वाही छत्रपती उदयनराजे यांनी या वेळी दिली. प्रत्येकाचे विचार एकसारखे असावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल यांनी वाचलाच नाही. यात पक्ष आणू नका. हे सगळ्या पक्षांना लागू होते. इथे प्रश्न समाजाचा आहे. आरक्षणप्रश्न ही राज्याची जबाबदारी आहे. सभागृहात एक बोलतात आणि बाहेर वेगळे. विशेष अधिवेशन होऊ द्या. मग बघू, असे उदयनराजे यांनी सांगितले.

---------------------------

...दिशाभूल करणे, हे रक्तात नाही

संभाजीराजे यांनी सांगितले की, सातारा आणि कोल्हापूर ही दोन घराणी एकत्र आली, एकमेकांची भेट घेतली, याचा आनंद आहे. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात.

चौकट

शाहू महाराज-पवार भेटीची कल्पना नाही

शाहू महाराज आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. “शाहू महाराज आणि अजित पवारांच्या भेटीबद्दल मला कल्पना नव्हती. ते आशीर्वाद घ्यायला आले असतील. त्यातून जर काही निघणार असेल तर आनंद आहे,” असे ते म्हणाले.

-------------

‘सुपर न्यूमररी’ वापरा

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींच्या सवलती मराठा समाजातील गरिबांना मिळाव्यात, जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करा आणि २१८५ विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या नियुक्त्या तत्काळ द्या. आमच्या या ५ मागण्या राज्य सरकारने लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार ‘सुपर न्यूमररी’चा वापर करू शकते. आजपर्यंत राज्यात ‘सुपर न्यूमररी’ पद्धत वापरली गेली आहे. आता शिक्षणातही वापरा, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

---------

(फोटो)

Web Title: If the 'kings' of democracy do not listen, then stop them: Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.