Exclusive Interview: 'मविआ' एकत्र लढली तर पुणे महापालिकेवरही आघाडीची सत्ता येईल; रवींद्र धंगेकरांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:14 PM2023-03-03T16:14:38+5:302023-03-03T16:14:46+5:30
महाराष्ट्रात आताच्या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे
पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत रवींद्र धंगेकर यांनी इतिहास घडवला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवून विजय मिळवला. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येऊन गेले. भाजपचे पदाधिकारी तर १०० टक्के आमचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत होते. पण अखेर रवींद्र यांच्या माध्यमातून कसबा विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आली.
रवींद्र धंगेकर निवडून आल्यावर नागरिकांच्या तोंडी मदतीला धावून येणारा माणूस, गोरगरिबांचा कर्ताधर्ता, अशा प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी तर आता कसब्याचा विकास होणारच असे मतही व्यक्त केले. अशातच रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महालिकेवरही आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पोटनिवडणुकीच्या विजयानंतर लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
धंगेकर म्हणाले, देशात, राज्यात राजकारण बदलत चालल आहे. आपल्या महाराष्ट्रात तर या सरकारने लोकांचे जीव घेण्याचं काम सुरु केलं आहे. अशा परिस्थितीत एकत्र राहणं गरजेचे आहे. आताही महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा फायदा आम्हाला झाला. येत्या काही दिवसात महापालिका निवडणुका येणार आहेत. त्यावेळीही महाविकास आघाडी एकत्र लढली तर पुणे महापालिकेवर आघाडीची सत्ता येईल.
आमदार झाल्यावर पुढील रणनीती कशी असणार असे विचारले असता धंगेकर म्हणाले, आता स्वतः आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मतदार संघातील लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आपल्या कामाचे प्राधान्य ठरवणार आहे.
मुक्ताताईंशी जवळचे नाते
मुक्ताताई आणि मी १५ वर्षे एकत्र काम करतोय. स्मार्ट सिटी, महापालिकेतील कामे करताना आम्ही एकत्र होतो. मला कुठल्याही कामात अडचण आल्यास मार्गदर्शनासाठी मी मुक्ता ताईंकडे जात असे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती. टिळक दाम्पत्यांचे नेतृत्व त्या करत होत्या. टिळकांचा वारसा मुक्ताताईंनी पुढे नेला होता. म्हणूनच मी निवडून आल्यावर टिळक कुटुंबियांच्या भेटीला गेलो. तसेच मुक्ताताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुढील कामासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला.
म्हणून मला उपोषणाला बसावं लागलं
निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यावरही चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस लोकंना भेटत होते. हे पोलिसांना माहीत असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र माझ्यावर गुन्हा दाखल होतो. यावरून असे स्पष्ट होते की, पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. मग आपण साधी माणसं कोणाकडे जाणार. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हुकूमशाही केली मग उपोषणाला बसावं लागलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले हे पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला माहित होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही दिली नाही उलट मलाच दिली.