आरक्षणासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:04 PM2021-05-27T17:04:06+5:302021-05-27T17:48:39+5:30
कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे...
कोरोनाचे संकट आहे म्हणून आयुष्य थांबलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला ४ जूनपर्यंत मुदत आहे. ही मुदत कोरोनामुळे वाढणार नाही व नंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही.मराठा समाजाने आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला तर वेळ निघून जाईल असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे, ती लोक सहन करणार नाहीत, अशा शब्दात पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केेली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजप एक राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करणार नाही. परंतु मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होईल त्यामध्ये आम्ही पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवाट सहभागी होणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे आहे. त्यांनी त्यासाठी नेतृत्व करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी भाजपा पाठिंबा देईल.
माथेरान येथील आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. उपनगराध्यक्ष आकाश कन्हैय्या चौधरी यांच्यासह शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण व रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
.
भाजपने छत्रपती संभाजीराजे यांचा आजपर्यंत सन्मानच केला आहे. भाजपा कार्यालयात येऊन अर्ज दाखल करावा लागू नये यासाठी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला.मराठा आरक्षणाबाबत त्यांनी पंतप्रधानांना भेट मागितली तरी मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा नसून राज्य सरकारचा आहे हे ध्यानात घ्यायला हवे.
... म्हणून देशात एक लाख तर महाराष्ट्रात वीस हजार गावात भाजप करणार कोविड संबंधित मदतकार्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोविडचे मोठे सावट आहे. त्यामुळे उत्सव न करता कोविडशी संबंधित सेवेचे काम करायचे निर्णय भाजपाने घेतला आहे. त्या दिवशी देशात एक लाख तर महाराष्ट्रात वीस हजार गावात जाऊन पक्षातर्फे सेवाकार्य करण्यात येईल. पक्षातर्फे देशभरात पन्नास हजार बाटल्या रक्तदान करण्यात येणार आहे.