"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 02:30 PM2021-08-29T14:30:00+5:302021-08-29T18:21:16+5:30
राज्य सरकार आणि उद्धव साहेबांवर टीका करणं एवढाच जनआशीर्वाद यात्रेचा होता उद्देश
पुणे : महाराष्ट्रात चार भाजप नेत्यांची जनआशीर्वाद यात्रा चालू आहे. यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन होतानाचे चित्र आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे, त्यातच आता राज्याचे तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यात्रेतील मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जन आशिर्वाद यात्रा ही जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी असली तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेवर टीका करणे एवढाच अजेंडा या यात्रेचा ठेवला गेला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये; असे केंद्र शासनाने सांगितले असले तरी केंद्रीय मंत्रीच केंद्र शासनाचे ऐकतं नसतील तर त्यांच्यावर केंद्र शासनानेचे कारवाई करून एक आदर्श घालून द्यावा, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करत आहेत. याबाबत उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, पेट्रोल, डिसेल ,दर केव्हा कमी होणार ? गॅसचे दर कमी करून गृहिणींना केव्हा दिलासा मिळणार ? याची उत्तरे जन आशिर्वाद यात्रा काढणा-या केंद्रीय मंत्र्याकडून कोकणाला हवी आहेत. तसेच लाखो बेरोजगार तरूणांना रोजगार केव्हा मिळणार ? त्यांच्या बँक खात्यात 15 लाख केव्हा जमा होणार? याची त्यांना प्रतिक्षा आहे. या प्रश्नांची उत्तरे देवून जन आशिर्वाद घेतला तर ती यात्रा फलदायी ठरेल,असे मला वाटते.
मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर काय होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने व टीका करणा-यांनी सुध्दा पाहिले आहे. तसेच ज्या प्रसंगासाठी टीका झाली त्या प्रसंगाला अनुसरून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. त्यावर सबंधित नेत्यांवर काय टीका करणार ? तसेच जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशासाठी, महाराष्ट्रासाठी काय करणार ? याची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत, असेही सामंत म्हणाले.