अशाच खेळींना वैतागून मी मनसे सोडली; रुपाली पाटलांनी वसंत मोरेंना दिली राष्ट्रवादीची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:22 PM2022-04-07T16:22:44+5:302022-04-07T16:22:51+5:30
आज साईनाथ बाबर यांची मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
पुणे- मनसेच्यापुणे शहराध्यक्षपदी साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे.
मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तर साईनाथ बाबरही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र बाबर यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर आज साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आज राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना आज मुंबईत बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022
वसंत मोरे यांच्याकडून पद काढून घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही मनसेच्या अंतर्गत खेळी आहे. वसंत मोरे यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. मात्र अशाच मनसेच्या खेळींना वैतागून मी मनसे सोडली. त्यावेळी मला ते म्हणाले होते की ही राजकीय आत्महत्या आहे. मग आज वसंत मोरेंची राजकीय हत्या केली का? असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे.
आपण वसंत मोरेंचं काम आपण पाहिलं आहे, ते खूप चांगलं काम करतात. त्यांना सर्व जातीपातीची लोक मतदान करतात. आज ज्या पद्धतीने ही खांदेपालट झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र साईनाथ बाबर यांच्या प्रभागातही मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे, त्यामुळे ही कुठली खेळी आहे हे कळत नाही, असं रुपाली पाटील म्हणाल्या. तसेच वसंत मोरे राष्ट्रवादीत आले तर त्यांचं स्वागत आहे, अशी ऑफरही रुपाली पाटलांनी दिली आहे.
साईनाथ बाबर यांना दिल्या शुभेच्छा-
वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई! असं ते यावेळी म्हणाले आहेत.
वसंत मोरेंनी केली होती नाराजी व्यक्त-
मी कधीही ठाकरे साहेबांवर नाराज होणार नाही. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका लक्षात घेतली तर १५ वर्षे ज्या भागात लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झालंय, असं वसंत मोरे म्हणाले होते.